उपनगर परिसरातील मंगलमूर्तीनगर येथे मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यास अटकाव करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच संबंधिताने धक्काबुक्की करत दमदाटी करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी सॅम पारखे याच्याविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगलमूर्तीनगर येथील हर्ष सोसायटीत ही घटना घडली. या ठिकाणी वास्तव्यास असणारा सॅम पारखे मद्याच्या नशेत शिवीगाळ करत गोंधळ घालत होता. स्थानिकांनी वैतागून त्याची माहिती उपनगर पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक सदाफुले हे कर्मचाऱ्यांना घेऊन तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पोलीस कर्मचारी आल्याचे पाहून संशयिताने त्यांना उलट धक्काबुक्की व दमदाटी सुरू केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलीसही चक्रावले. त्यांनी संशयित पारखेला ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या व्यक्ती यंत्रणेला जुमानत नसल्याचे दर्शविणारी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याआधी वाहतूक पोलिसांना रिक्षा चालकांकडून धक्काबुक्की झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलीस रिक्षा चालकांवर कारवाई करताना दहा वेळा विचार करताना दिसतात. कारवाई केली की रिक्षाचालक थेट पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जातात. प्रसंगी मारहाणही केल्याचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत.