News Flash

 ‘नो सेल्फी झोन’मध्ये छायाचित्र काढल्यास पोलीस कारवाई

त्र्यंबकेश्वरसह अनेक भाग जलमय झाले असून ठिकठिकाणी डोंगर-दऱ्यांतून धबधबे कोसळत आहेत

कसारा घाटात अनेक लहान-मोठे धबधबे कोसळत असून अशा ठिकाणी वाहन थांबवू नका, असे फलक लावले गेले असतांनाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पर्यटक वाहन थांबवून सेल्फी काढत आहेत.     (छाया - समृद्धी अमृतकर)

पर्यटकांचा आततायीपणा रोखण्यासाठी उपाययोजना

नाशिक : जिल्हा प्रशासनाने पर्यटनस्थळी दुर्घटना घडू नये म्हणून अनेक धोकादायक ठिकाणे ‘नो सेल्फी झोन’ म्हणून जाहीर केली असून दरड कोसळण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी माहिती फलकही उभारले आहेत. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याने नदीपात्र, धबधबे किंवा तत्सम धोकादायक ठिकाणी ‘सेल्फी’ काढणाऱ्यांवर आता पोलीस कारवाई करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले आहेत.

सलग चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह अनेक भाग जलमय झाले असून ठिकठिकाणी डोंगर-दऱ्यांतून धबधबे कोसळत आहेत. वर्षां सहली जोमात सुरू झाल्या असून शहर आणि ग्रामीण भागातील बहुतांश पर्यटनस्थळे पर्यटकांनी ओथंबून वाहात आहेत. या काळात कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने शहर, ग्रामीण भागातील धोकादायक स्थळांची निश्चिती करीत ‘नो सेल्फी झोन’ जाहीर केले आहेत. यामध्ये शहरातील सोमेश्वर मंदिर, सोमेश्वर धबधबा, रामकुंड, तपोवन, पांडवलेणी, चामार लेणी, नवश्या गणपती, संत गाडगे महाराज पूल, अहिल्यादेवी होळकर पूल, आसारामबापू पूल, चोपडा लॉन्सलगतचा पूल, गंगापूर धरण, आशावाडी किल्ला यांचा समावेश आहे.

या ठिकाणी मार्गक्रमण करताना पुरेशी दक्षता घ्यावी,  तिथे ‘सेल्फी’ काढू नये असे फलकही लावले गेले. परंतु, त्याचा उपयोग झालेला नाही. मोठय़ा संख्येने येणारे पर्यटक सुरक्षेच्या बाबीकडे दुर्लक्ष करतात. भ्रमणध्वनीवर छायाचित्र टिपण्याची चढाओढ सुरू असते. संबंधितांना वारंवार सूचना देऊनही पर्यटकांच्या कार्यशैलीत बदल होत नसल्याने अखेर आता संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे.

ग्रामीण भागातील धोकादायक ठिकाणे

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शहराबरोबर पावसाळ्यात धोकादायक ठरू शकतील अशा ग्रामीण भागातील स्थळांची यादी तयार करून तिथे ‘नो सेल्फी झोन’ जाहीर केले आहेत. त्यामध्ये इगतपुरी तालुक्यात भावली धरण, अशोका धबधबा, कसारा घाट, त्रिंगलवाडी किल्ला, कॅमल व्हॅली, घाटनदेवी विपश्यना केंद्र, अलंग-कुलंग-मलंग, वैतरणा धरण, भातसा नदी आणि धरण परिसरचा समावेश आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये दुगारवाडी, पहिने, ब्रह्मगिरी, अंजनेरी, वाघेरा घाट, तोरंगण घाट, दाभोसा धबधबा, कुशावर्त, हरिहर गड. बागलाण तालुक्यात मांगी-तुंगी, साल्लेर-मुल्हेर, निफाडमधील नांदूरमध्यमेश्वर, कळवण येथील सप्तशृंगी गड, चांदवडचे रेणुका मंदिर, धोडप किल्ला, येवल्यातील अनकाई, अगस्ती ऋषी मंदिर, सुरगाण्यातील हतगड किल्ला, भेगू धबधबा, सापुतारा रस्ता यांचा समावेश आहे.

वारंवार सूचना देऊनही पर्यटक नियमांकडे दुर्लक्ष करतात. धोकादायक ठिकाणी मार्गक्रमण करणे, सेल्फी काढणे असे प्रकार घडतात. प्रारंभी सूचना देण्यावर भर दिला गेला. परंतु, आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर थेट फौजदारी कारवाई करावी, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. संबंधितांवर दंडात्मक कारवाई होईल.

– प्रशांत वाघमारे (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 2:18 am

Web Title: police action if photograph taken in no selfie zone zws 70
Next Stories
1 चार तालुक्यांत संततधार, सहा तालुके कोरडे
2 गर्भधारणेपूर्वीच उपचारामुळे सुरक्षित मातृत्वाकडे वाटचाल
3 ‘लालपरी’चा इतिहास उलगडला
Just Now!
X