शहर परिसरातील अवैध व्यवसायांना चाप बसावा यासाठी पोलीस सक्रिय झाले असून गुरुवारी परिमंडळ दोनअंतर्गत झालेल्या कारवाईत जुगार अडय़ांवर दोन ठिकाणी छापे मारण्यात आले. यामध्ये एकूण दोन लाखांहून अधिक रक्कम, जुगाराचे साहित्य आणि भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले आहेत. संशयितांना ताब्यात घेतले असून नाशिकरोड तसेच सातपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड परिसरातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाचे जुने कार्यालय आहे. या ठिकाणी काही मंडळींनी जुगार, मटका असे अवैध व्यवसाय सुरू केले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी पोलिसांनी कार्यालयाच्या आवारात छापा टाकला असता काही संशयित हे मटका खेळताना दिसून आले. पोलिसांनी या वेळी केलेल्या धडक कारवाईत हुसेन मोगल, शाम शिरसाठ, धनंजय दोंदे, विजय राखपसरे, अरुण गरुड, प्रमोद देशमुख, सचिन मेंद्रे यांच्यासह १३ संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून २८,५१६ रुपये रोख रक्कम व १३ भ्रमणध्वनी आणि एक दुचाकी असा एकूण एक लाख तीन हजार ५१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितांना नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.