शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी पोलीस यंत्रणेला जबाबदार धरल्यानंतर पोलीस महासंचालकांना कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेऊन स्थानिक यंत्रणेला तंबी देणे भाग पडले. यामुळे गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईसाठी पोलिसांची धडपड सुरू आहे. बुधवारी रात्री शहरात पुन्हा एकदा धडक मोहीम राबवत ४७ गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. कागदपत्रे न बाळगणे आणि नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांविरुद्धही कारवाई करण्यात आली. काही टोळ्यांविरोधात कारवाई झाली असली तरी गंभीर गुन्हे दाखल असलेला पीएल ग्रुपचा म्होरक्या आणि नगरसेवकपूत्र भूषण लोंढे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

नाशिकच्या ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेचा विषय गेल्या काही महिन्यांपासून ऐरणीवर आला आहे. वाहनांची जाळपोळ, टवाळखोरांचा धुडगूस, टोळीयुद्ध, खून, महिलांचे दागिने खेचून नेणे या घटनांनी शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावरून ओरड होऊ लागल्यानंतर आणि विरोधकांनी सत्ताधारी भाजपसह पोलीस यंत्रणेला जबाबदार धरल्यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांना सलग दोन वेळा कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घ्यावी लागली. गुन्हेगारीचा बीमोड न झाल्यास पोलीस आयुक्तांच्या बदलीचे संकेतही त्यांनी दिले. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या दीक्षान्त सोहळ्यानिमित्त येथे आलेले पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी आढावा बैठक घेत यंत्रणेला तंबी दिली. इतकेच नव्हे तर पुढील काही दिवसात परिस्थितीचा पुन्हा आढावा घेण्याचे सूचित केले आहे. या घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झालेली पोलीस यंत्रणा गुन्हेगारांच्या शोधासाठी जंगजंग पछाडत आहे. बुधवारी रात्री शहरातील भद्रकाली वगळता उर्वरित सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. भद्रकाली पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर असल्याने या हद्दीत ती राबविली गेली नाही.

इतर बारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ४७ गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच व्यापाऱ्याकडे पाच लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी सिडकोतील टिप्पर गँगच्या पाच जणांना जेरबंद करत पोलिसांनी अन्य टोळ्यांकडे लक्ष केंद्रित केले. परंतु, त्यांचे म्होरके अद्याप पोलिसांच्या जाळ्यात सापडलेले नाही. राजाश्रयामुळे फोफावलेल्या अनेक गुन्हेगारी टोळ्या शहरात कार्यरत आहेत. पीएल ग्रुप ही त्यापैकीच एक. ३१ डिसेंबरच्या रात्री सातपूर पोलीस ठाण्यालगत जगताप वाडीत पीएल ग्रुपच्या कार्यालयात दोन सराईत गुन्हेगारांची हत्या झाली होती. संबंधितांचे मृतदेह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जव्हार फाटा येथे फेकण्यात आले. या प्रकरणात तात्पुरता जामीन घेऊन फरार झालेला पीएल ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढे अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. याच प्रकरणातील संशयितांना न्यायालयाच्या आवारात मद्य देण्याचा प्रयत्न नगरसेवक प्रकाश लोंढेने केला होता. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना त्याने धक्काबुक्कीही केली. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून तोही फरार आहे.