इगतपुरी येथे चोरी, घरफोडी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळविले. १ नोव्हेंबर २०१५ रोजी चोरटय़ांनी इगतपुरी येथील शिवाजीनगरमध्ये करण पाल यांच्या घराचे कुलूप तोडून १४८०० रुपये किमतीचा टीव्ही, मोबाइल असा माल चोरी करून नेला होता. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तसेच इगतपुरी येथीलच अनिलकुमार सिंह यांना रस्त्यात चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील मोबाइल व रोख रक्कम असा २८०० रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. जबरी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्य़ांना आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपासात गुन्हे शाखेच्या पथकाने भूषण अहिरे (शिवाजीनगर), संजय हांडोरे (मिलिंदनगर), इब्राहिम अब्दुल अजिज शेख (१२ बंगला रोड), जहांगीर इब्राहिम खान (ग्रीनशॉप) या इगतपुरी येथील चोरटय़ांसह कसारा येथील अक्षय जगताप यांना ताब्यात घेतले. संशयितांनी इगतपुरी येथे जबरी चोरी, घरफोडी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला असून त्यांना इगतपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.