• १३५ सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन ८२ जणांवर कारवाई
  • १०४ टवाळखोरांवर तर २८ मद्यपींवर बडगा उगारला
  •  १०४ वाहनचालकांकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल

विधानसभा निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडावी, यासाठी पोलिसांनी संपूर्ण शहरात गुन्हेगारांची शोध मोहीम राबविली. त्या अंतर्गत सातपूर औद्योगिक वसाहतीत गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली. तर १०४ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. नाकाबंदी मोहिमेत ३५० वाहनांची तपासणी करीत १०४ वाहनचालकांकडून  २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या २८ जणांवर कारवाई करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. शहरात नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिमसह देवळाली मतदारसंघाचा काही भाग येतो. मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी, यासाठी पोलिसांनी मंगळवारी रात्री ते बुधवारी मध्यरात्रीपर्यंत सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांची शोध मोहीम राबविली. वाहन तपासणीसाठी नाकाबंदी, तडीपार, हव्या असणाऱ्या गुन्हेगारांचा शोध, टवाळखोर, हॉटेल आणि लॉजची तपासणी करण्यात आली. शहरातील सर्व झोपडपट्टय़ा पिंजून काढण्यात आल्या. शहरातील सर्व भागात राबविण्यात आलेल्या मोहिमेत विविध कारणांवरून १०४ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली गेली. १३५ सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन ८२ जणांवर कारवाई करण्यात आली. ५९ तडीपारांचा शोध घेतला गेला. परंतु, त्यातील कोणी मिळून आले नाही.

या कारवाईत ३२ लॉजची तपासणी करण्यात आली. १६ झोपडपट्टय़ांची तपासणी करण्यात आली. या कारवाईची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत चार उपायुक्त, सात साहाय्यक आयुक्त, २५ निरीक्षक, ४९ साहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक ४५१ पोलीस कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाचे जवानही सहभागी झाले होते.

गावठी पिस्तूल हस्तगत

सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संशयित कंबरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयित प्रशांत जाधव (३८, गोवर्धन) यास अटक केली. त्याची झडती घेतली असता २५ हजार रुपयांचे गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आढळून आली. सातपूर हद्दीत पाच अधिकारी आणि ४० कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांची शोध मोहीम राबविली. त्यात मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या पाच जणांवर कारवाई, १३ जणांना समन्स बजावण्यात आले.