भाजपतर्फे कारसेवकांचा घरोघरी जाऊन सत्कार

नाशिक : अयोध्येत बुधवारी राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. मंदिरासठी १९९२ मध्ये झालेल्या आंदोलनात नाशिकमधील शेकडो कारसेवकांनी सहभाग घेतला होता. या कारसेवकांचा सन्मान करण्यासाठी बुधवारी कार्यक्रमाचे नियोजन भाजपने केले होते. परंतु, त्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन कारसेवकांचा सत्कार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. या पार्श्वभूमीवर, याच दिवशी स्थानिक कारसेवकांचा सत्कार सोहळ्याचे नियोजन भाजपने केले होते. नाशिकमधील ४०० ते ५०० कारसेवक १९९२ मध्ये अयोध्येला गेले होते. त्यांच्या योगदानामुळेच हा आनंदोत्सव साजरा करता येत असल्याने त्यांचा सन्मान करण्यासाठी बुधवारी नाशिक पश्चिम मतदारसंघात कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार होते. मात्र, स्थानिक पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव या कार्यक्रमास परवानगी नाकारली. या पार्श्वभूमीवर, भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला आ. सीमा हिरे आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारसेवकांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदारांसह प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, महेश हिरे, अनिल चांदवडकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत माजी आमदार निशीगंधा मोगल, राजाभाऊ मोगल, बाबा फडके, डॉ. झुंबर भंदुरे, दादा पत्नपारखी, रमेश गायधनी, राजाभाऊ  गुजराथी, गोविंदराव यार्दी, बन्सी जोशी, दिलीप क्षीरसागर आदी कारसेवकांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व कारसवेकांना प्रभु रामचंद्र आणि राम मंदिराची प्रतिकृती असलेले स्मृतीचिन्ह, चेहरा आवरण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.