पोलीस तीन दिवसांपासून रस्त्यावर, दौरा संपल्यानंतर पोलिसांचा सुटकेचा नि:श्वास

शहर परिसरात दोन दिवस राष्ट्रपती असल्याने या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा ताफा तीन दिवसांपासून रस्त्यावर नाकाबंदी तसेच अन्य कामांत गुंतलेला राहिला. गुरुवारी दुपारी राष्ट्रपतींनी शहर परिसर सोडल्यानंतर पोलीस यंत्रणेने सुटकेचा श्वास घेतला.

राष्ट्रपती देवळालीतील आर्टिलरी स्कूलच्या ‘निशाण’ प्रदान तसेच तोफखाना येथील ‘रुद्रनाद’ संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी बुधवार आणि गुरुवारी नाशिक दौऱ्यावर होते. राष्ट्रपतींच्या दौऱ्याची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नाशिक शहर आणि जिल्हा पोलिसांनी बंदोबस्त तैनात ठेवला होता. शहर, जिल्हा पोलिसांनी आपल्याकडील १३ ठाण्यांतील पोलीस अधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेसह वेगवेगळ्या विभागांची मदत घेत सुरक्षेच्या दृष्टीने औरंगाबाद, जळगाव, धुळे, अहमदनगर येथूनही कुमक मागवली.

बॉम्बशोधक-नाशक पथकासह वेगवेगळी पथके बंदोबस्तावर ठेवण्यात आली. प्रत्येकावर वेगवेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. राष्ट्रपतींच्या येण्याच्या आणि जाण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला. दौऱ्याच्या पूर्वदिवशी बंदोबस्ताची दोन वेळा रंगीत तालीम करण्यात आली. तीन दिवसांपासून पोलीस नेमून दिलेल्या जागेवर होते. आधी तालीम नंतर प्रत्यक्ष काम करताना त्यांना नागरिकांच्या प्रश्नांसह अन्य अडचणींना तोंड द्यावे लागले.

गुरुवारी सकाळपासूनच विश्रामगृहापासून नाशिक रोड तसेच देवळालीकडे ज्या मार्गाने राष्ट्रपती जाणार होते, त्या मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी करण्यास सुरुवात केली होती.

वाहतूक पोलिसांच्या मदतीने कार्यक्रमाच्या आधी वाहतूक थांबवीत ती अन्य मार्गाने वळविताना वाहनचालकांसह पादचाऱ्यांशी पोलिसांचे वादाचे प्रसंग उद्भवले. मात्र पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळत आपले कर्तव्य पार पडले. अखंड ४८ तासांहून अधिक काळ सेवा बजावत असताना गुरुवारी दुपारी चारनंतर राष्ट्रपती पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.

रुग्णवाहिकेची अडवणूक

काही दिवसांपूर्वी रुग्णवाहिकेसाठी राष्ट्रपतींचा ताफा थांबविणाऱ्या दक्षिण भारतातील पोलिसांचे सर्वानी कौतुक केले होते. तसे मात्र नाशिकमध्ये घडले नाही. राष्ट्रपती  बुधवारी रात्री नाशिकमध्ये दाखल झाले. विश्रामगृहावर ते मुक्कामासाठी जात असताना पोलिसांनी ठिकठिकाणी वाहतूक बंद केली होती. या गर्दीतून वाट काढत रुग्णवाहिका पुढे आली; परंतु विश्रामगृहानजीकच्या चौफुलीवर रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी शहर पोलिसांनी वाट दिली नाही. रुग्णवाहिकेतील रुग्णाला हृदयविकाराचा झटका आलेला होता. त्याचे नातेवाईक वाहन पुढे जाऊ देण्याची विनवणी करत असतानाही राष्ट्रपतींचा ताफा येत असल्याने रुग्णवाहिकेला या गर्दीत अडकून पडावे लागले.