नियमपालन करणाऱ्या चालकांसाठीच्या उपक्रमाला यश

बंगळूरु येथील महिलेचे रिक्षात विसरलेले विमान तिकीट, भ्रमणध्वनी आणि इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रे परत करणारे रिक्षाचालक आयुब अब्दुल रहेमान सय्यद यांचा भद्रकाली पोलिसांच्या वतीने सत्कार करण्यात आला. रिक्षाचालकांची समाजातील प्रतिमा उंचावण्यासाठी शहर पोलिसांनी राबविलेल्या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम करण्यात आला.

शहरातील काही रिक्षाचालकांमधील गुन्हेगारी वृत्ती आणि बेशिस्तपणा याविषयी नाशिककर चांगलेच परिचित असताना शहर पोलिसांनी नियमांचे पालन करणाऱ्या, प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांसाठी खास उपक्रम सुरू केला आहे. रिक्षाचालकांविषयीची समाजातील प्रतिमा बदलण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना या माध्यमातून बळ मिळणार आहे, असा पोलिसांचा विश्वास आहे.

रिक्षाचालक आयुब अब्दुल रहेमान सय्यद यांच्या प्रामाणिकपणाची घटना बंगळूरु येथील एका प्रवाशाबाबत घडली. बंगळूरु येथील रुचिता पंगारिया या रविवारी काही कामानिमित्त नाशिकमध्ये आल्या होत्या. पंगारिया दाम्पत्याने शहरातील काम आटोपून जिल्हा परिषद भागातून काळाराम मंदिरात जाण्यासाठी सय्यद यांच्या रिक्षाने प्रवास केला.

काळाराम मंदिर येथे प्रवासी उतरल्यानंतर रिक्षाचालक निघून गेला. आपली पर्स रिक्षामध्येच राहिल्याचे पंगारिया दाम्पत्याच्या लक्षात आले. देवदर्शन आटोपून दाम्पत्याने भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्या संदर्भात माहिती दिली. पोलिसांनी माहिती घेऊन जिल्हा परिषद परिसरात अन्य रिक्षाचालकांकडे चौकशी सुरू केली. दरम्यानच्या काळात संबंधित रिक्षाचालक आयुब अब्दुल रहेमान सय्यद हे भद्रकाली पोलीस ठाण्यात आले. त्यांनी प्रवासी रिक्षात पर्स विसरल्याचे सांगून ती पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांनी पंगारिया दाम्पत्याशी संपर्क साधून पर्स सापडल्याची माहिती दिली.

या पर्समध्ये भ्रमणध्वनी, आठ हजार रुपये रोख, मुंबई ते बंगळूरु विमान तिकीट, पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे होती. पंगारिया दाम्पत्याने ठाण्यात येऊन पोलिसांचे आभार मानून प्रामाणिकपणाबद्दल रिक्षाचालकाचे अभिनंदन केले. या प्रामाणिकपणाबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, साहाय्यक निरीक्षक विशाल गिरी, उपनिरीक्षक सुनील कासर्ले, हवालदार फरीद इनामदार आदींनी रिक्षाचालकाचा सत्कार केला.