05 June 2020

News Flash

‘गो करोना गो’ आरोळी महागात पडली

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकसह राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

चार टवाळखोरांविरोधात गुन्हा

नाशिक : पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनास शहरवासीयांनी रविवारी रात्री भरभरून प्रतिसाद दिला. नऊ मिनिटे दिवा, पणती, भ्रमणध्वनीची विजेरी लावून शांतता बाळगली. परंतु, अनेक भागात याचवेळी जणू दिवाळी साजरी झाली. काहींनी फटाक्यांची आतषबाजी केली. गो करोना गो च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. विना परवाना हवेत ड्रोन उडवले. संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करत अशा प्रकारात गुंतलेल्या चार टवाळखोरांविरुध्द मुंबई नाका पोलिसांनी कारवाई केली. पखाल रस्त्यावरील सप्तश्रृंगीनगर येथे ही कारवाई करण्यात आली.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकसह राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. त्या अंतर्गत गर्दी टाळणे, सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन प्रशासकीय यंत्रणा करीत आहे. २१ दिवसांच्या टाळेबंदीत जमावबंदी, संचारबंदी लागू केली गेली. पंतप्रधानांनी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे शांततेत दीप प्रज्वलित करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहर पोलीस सर्व भागात गस्त घालून लक्ष देऊन होते. मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पथक पखाल रस्त्यावरील सप्तश्रृंगी कॉलनीत गस्त घालत असतांना निलोफर अपार्टमेंटसमोरील सार्वजनिक जागेत एकत्र जमून गो करोना गो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. इतकेच नव्हे तर, संबंधितांनी विनापरवाना हवेत ड्रोन उडवले. एकत्र जमून आरोळ्या ठोकून, विना परवाना हवेत ड्रोन उडविल्याा प्रकरणी पोलिसांनी राहुल पेखळे, सुमीत कोरपड, प्रथमेश निचळ, किरण विंचूरकर (सर्व रा. निलोफर अपार्टमेंट) यांना ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त अमोल तांबे, निरीक्षक विजय ढमाळ आदींच्या नेतृत्वाखाली टवाळखोरांवर कायदेशीर

कारवाई करण्यात आली. संशयितांकडून ड्रोनसह त्यामध्ये लावलेला भ्रमणध्वनी जप्त करण्यात आला.

दरम्यान, शहरात विनाकारण विना परवानगी फिरण्यास प्रतिबंध आहे. सार्वजनिक ठिकाणी शांतता, सुव्यवस्था बिघडणार नाही याची प्रत्येकाने दक्षता बाळगणे गरजेचे आहे. विनाकारण, परवानगी शिवाय फिरणाऱ्यांविरुध्द संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 3:47 am

Web Title: police file offense against four for violation of curfew rules zws 70
Next Stories
1 आयएमए ६२ दवाखाने सुरू करणार
2 अंगणवाडी सेविकांची दुहेरी कोंडी
3 करोनाबाधित क्षेत्रातून आलेल्यांनी स्वत:हून पुढे यावे
Just Now!
X