26 September 2020

News Flash

हेल्मेटसक्ती कारवाईमुळे वाहनचालकांची भंबेरी

ग्रामीण विभागांत पोलिसांची मोहीम

पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी देवळा येथे भेट देऊन कारवाईचा आढावा घेत हेल्मेट घालणाऱ्या वाहनचालकांचे कौतुकही केले. (छाया- महेश सोनकुळे)

ग्रामीण विभागांत पोलिसांची मोहीम

नाशिक : शहरी, ग्रामीण भागात हेल्मेट नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागल्याची उदाहरणे आहेत. २०१८ या वर्षांत केवळ शहरात दुचाकी अपघातात १२६ चालकांचा मृत्यू झाला. त्यात ११२ दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. ग्रामीण भागात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. या पाश्र्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि सीटबेल्टचा वापर न करणाऱ्या चारचाकी वाहनधारकांविरोधात शुक्रवारपासून धडक कारवाईला सुरुवात केली. सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई सुरू झाल्यामुळे नियम खुंटीवर टांगणाऱ्या वाहनधारकांची भंबेरी उडाली. कारवाई आणि जनजागृती असे या अभियानाचे स्वरूप आहे.

हेल्मेट परिधान न करता दुचाकी चालविणारे आणि सीटबेल्ट न लावता चारचाकी वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात कारवाईसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने सर्व ठाण्यांच्या हद्दीत  विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी महामार्गावरील अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. त्यानेही हेल्मेट परिधान केले नव्हते. हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असूनही वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करतात. चारचाकी सीटबेल्टच्या नियमांचा अव्हेर करण्यात धन्यता मानली जाते. बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे. ओझरसह सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाईला सुरुवात झाली. पूर्वकल्पना नसणारे शेतकरी, महाविद्यालयीन युवक आणि चारचाकी वाहनधारक कोरवाईच्या कचाटय़ात सापडले. महामार्गावरील दहावा मैल येथे ओझर ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे, वाहतूक पोलीस कर्मचारी आदींच्या पथकामार्फत बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या ठिकाणी पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी भेट दिली. कारवाईचा आढावा घेऊन वाहनधारकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी गावागावांत जनजागृतीविषयक फलक लावले जात असून पत्रकांचे वाटप करण्यात येत आहे. तसेच महाविद्यालय,सार्वजनिक ठिकाणी पोलीस यंत्रणा वाहतुकीचे नियम पालन करावे, असे आवाहन करीत आहे. दुचाकीस्वारांनी स्वत:च्या जीविताच्या संरक्षणासाठी हेल्मेट वापरणे काळाची गरज असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

दर वाढण्याची धास्ती

हेल्मेटसक्तीसाठी कारवाईला सुरुवात झाली असली तरी ग्रामीण भागात हेल्मेट विक्रीची दुकाने कमी असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. एखाद्याला हेल्मेट खरेदी करण्याची इच्छा असली तर शहर किंवा तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. कारवाईमुळे हेल्मेटच्या दरात वाढ होईल, अशी काहींना धास्ती आहे. ग्रामीण भागात मोजकेच वाहनधारक हेल्मेट परिधान करतात. हेल्मेटविना दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 1:12 am

Web Title: police fined for not wearing helmets in rural areas
Next Stories
1 कॉपी आणि तणावमुक्त परीक्षा अभियान
2 budget 2019 : कुठे खुशी, कुठे नाराजी
3 स्मार्ट रस्त्याच्या कामाची अजब तऱ्हा!
Just Now!
X