मुख्यमंत्र्यांचे आदेश; राष्ट्रवादीचा मूकमोर्चा
सटाणा येथील माजी नगराध्यक्ष विजय वाघ यांना झालेल्या अमानुष मारहाणप्रकरणी पोलीस निरीक्षक पी. टी. पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय वाघ, माजी आमदार संजय चव्हाण व अन्य पाच जणांना पोलिसांनी बस स्थानकाजवळ अमानुष मारहाण केली होती. हा सर्व प्रकार परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या वेळी पोलीस अधिकारी आणि अन्य लोकांमध्ये काही शाब्दिक वाद झाले.
राजकीय मंडळींनी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पोलीस ठाण्यावर हल्ला करत सामानाची नासधूस केली. या वेळी पोलिसांनी लाठीमार केला. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. मारहाणीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी मूक मोर्चा काढण्यात आला.
हा संपूर्ण घटनाक्रम आ. दीपिका चव्हाण, माजी गृहमंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिला.
भाजप सरकारच्या काळात पोलीस अधिकारी इतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा कसा अमानुष छळ करत आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनी केलेली मारहाण माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे नमूद करत पोलीस निरीक्षक पाटील यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देत असल्याचे सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी पाटील यांची ओझरला बदली करण्यात आली होती.