बँक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन
जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात अलीकडील काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या सात शाखांवर दरोडे पडण्याच्या घटना झाल्याने सतत घडणाऱ्या गुन्ह्य़ांना प्रतिबंध व करावयाच्या उपाय योजनांची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित बैठकीत बँक अधिकारी व व्यवस्थापकांना देण्यात आली.
पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर अधीक्षक प्रशांत मोहिते, निरीक्षक किशोर नवले, बैठकीस उपस्थित होते. यावेळी बँक व्यवस्थापक व अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व बँकांमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित बसवावेत, अतिरिक्त कॅमेरा बँकेच्या बाहेरील बाजूस बसवून बँक व परिसरातील रस्ता व आजूबाजूचा परिसर दिसेल असा लावावा, सर्व बँकांच्या ठिकाणी सशस्त्र पहारेकरी नेमावा, रोख रकमेची वाहतूक करताना सुरक्षित वाहन वापरावे, जास्त रक्कम असल्यास पोलीस बंदोबस्त मागून घ्यावा, बँकांच्या बाहेर रात्री पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवण्याबाबतच्या सूचनांचे अवलोकन करावे, अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था बसवावी, बँकेत नजरेस येईल अशा ठिकाणी ठळक अक्षरात हेल्पलाईन क्रमांक व नियंत्रण कक्षाचा क्रमांक, संबंधित पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक नमूद करावा, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या.
अनेक बँका जुन्या इमारतीत आहेत. बँकेमार्फत सर्व शाखांची पाहणी करण्यात येवून मोडकळीस आलेले दरवाजे, खिडक्या व इमारतीची दुरूस्ती करावी, सर्व शाखांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र पथक नेमावे, त्यांच्याकडून सुरक्षेबाबत वेळोवेळी फेरआढावा घेण्यात यावा, त्याबाबतचे परीक्षण देखील करावे, निर्जनस्थळी असलेल्या बँका त्वरित वस्ती असलेल्या ठिकाणी स्थलांतरीत कराव्यात, विशेषत: सुटीच्या दिवशी बँकेतील रोकड दुसऱ्या सुरक्षित बँकेत ठेवावी, बँकेकडील अधिकारी व कर्मचारी यांना बँक सुरक्षिततेबाबत पोलिसांकडून प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी अधिकारी-कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत व प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करावा, सहनिबंधकांकडे बंदुकधारी सुरक्षारक्षक नेमण्यासंदर्भातील प्रस्ताव त्वरित पाठवावा, दररोज दुपारी चार वाजता बँकेतील शिल्लक रकमेचा अंदाज घेवून संबंधित बँक व्यवस्थापकांनी सहा वाजेच्या आत शिल्लक रक्कम सुरक्षित बँकेत वर्ग करावी. रकमेस उशीर झाला तर व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी बँकेतच थांबण्याची व्यवस्था करावी. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यास कळवावे. बँकेचे लॉकर्स हे नामांकित कंपनीचे बसवावेत. हल्ली बाजारात सुरक्षेची अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असून त्याचा योग्य रितीने वापर करण्यात यावा. एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पैशाची ने-आण करताना जोपर्यंत बँकेकडून शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांची मंजुरी मिळत नाही तोपर्यंत पोलीस संरक्षण मागून घ्यावे ते त्वरित देण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या.