नाशिक : वेगवेगळ्या शासकीय निर्णयांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका बसलेल्या नागरिकांमध्ये असणारा असंतोष पाहता बुधवारी शहरात दाखल होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत तसेच गुरुवारी पंतप्रधान यांच्या जाहीर सभेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर तसेच जिल्हा पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे.

शेतकरी आत्महत्या, कांदा आयात-निर्यात धोरण, अपंगाचे प्रलंबित प्रश्न, आशा -गटप्रवर्तकांच्या मानधनाविषयी असणारा तिढा अशा वेगवेगळ्या प्रलंबित प्रश्नांसह इतर काही समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शहर परिसरातील काही समविचारी संघटना एकत्रित आल्या आहेत.

बुधवारी शहरात दाखल होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यात्रेत निषेध नोंदविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा काही संघटनांनी दिला. या पाश्र्वभूमीवर शहर तसेच जिल्हा पोलिसांकडून काहींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शहरातून आशा गट प्रवर्तक संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले यांना भद्रकाली पोलिसांच्या वतीने सी.आर.पी. सी १४९ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये संघटनेच्या मागण्यांकरिता महाजनादेश यात्रा तसेच पंतप्रधानाच्या जाहीर सभेत काही नारेबाजी, निदर्शने, प्रक्षोभक कृत्य केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. देसले यांच्यासह काही राजकीय मंडळी, संस्थांनाही याविषयी इशारे देण्यात आले आहेत.  दरम्यान, जिल्हा पोलिसांच्या वतीने काही शेतकरी संघटना, व्यक्ती यांचा या कार्यक्रमांना असलेला विरोध पाहता त्यांच्यांशी वैयक्तिकरित्या संवाद साधला जात आहे. त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येणार आहेत. आपल्या मागण्या, आपला विरोध सभास्थळी किंवा यात्रेत नोंदविण्यापेक्षा सनदशीर मार्गाने नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिली.