नाशिक : करोनाचा वाढता संसर्ग खंडित करण्यासाठी जिल्ह्य़ात बुधवार दुपारपासून टाळेबंदी लागु करण्यात आली आहे. तत्पूर्वी लोकांनी सकाळपासूनच बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. भद्रकाली परिसरात सर्व दुकाने सर्रास उघडी होती. एक वाजेनंतर मात्र पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद देण्यास सुरुवात के ल्यानंतर रस्ते सामसूम झाले.

जिल्ह्य़ात करोनाग्रस्त रुग्णसंख्येने तीन लाख, ५०,१०६  चा टप्पा पार केला असून आतापर्यंत करोनामुळे तीन हजार ९३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टाळेबंदीचा अंतिम पर्याय स्वीकारत बुधवारी दुपारी १२ पासून त्याची अंमलबजावणी सुरू केली. टाळेबंदी लागण्यापूर्वी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली. भाजी बाजार, किराणा खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली असतांना पोलिसांनीही या गर्दीला शिस्त लावण्यासाठी दंडात्मक कारवाई सुरू केली.

गर्दीमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. मुस्लीम बांधवांनी ईदची तर, हिंदू बांधवांनी अक्षयतृतीयेची खरेदी केली. काही तासातच भाजीपाला संपल्याने लोकांनी अंडी, चिकन, बोंबिलसाठी गर्दी केली. तेदेखील हातोहात संपले. अनेक ठिकाणी दुपारी १२ नंतरही किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री सुरु होती. दुपारी एकनंतर पोलीस, मनपा अधिकारी, कर्मचारी यांनी रस्त्यावर येऊन विक्रते आणि ग्राहकांना पिटाळून लावले. जुने नाशिक परिसरात ईदनिमित्त खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली. यावेळी जीवनावश्यकसह अन्य दुकानेही खुली झाली. नाशिकरोड, सिडको, सातपुर, पंचवटी परिसरात दुपारी १२ नंतर शुकशुकाट होण्यास सुरूवात झाली होती. पोलिसांनी ठिकठिकाणी अडथळे उभारत बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना हटकण्यास सुरुवात केली. सिडको येथे दुपारी १२ नंतर पेट्रोल पंपावर आलेल्या वाहनचालकांना लाठीचा प्रसाद दिला. पंचवटी परिसरातही १२ वाजेनंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानमालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. समज देऊनही न  ऐकणारे दुकानदार तसेच नागरिकांना दंडुक्याचा प्रसाद मिळाला. दुपापर्यंत या भागात ६० हून अधिक दुकानमालकांवर कारवाई करण्यात आली.

नाशिक पूर्वमध्ये असलेल्या भद्रकाली, मेनरोड परिसरात दुपारी १२ नंतर काहीअंशी गर्दी कमी झाली असली तरी नागरिकांचा खरेदीचा उत्साह कायम होता. विशेष म्हणजे जुन्या महापालिकेसमोर असलेल्या कापड दुकानांमध्ये ग्राहक दुपारी तीनपर्यंत खरेदी करत होते. महापालिका तसेच पोलिसांनी घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. याविषयी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांना विचारले असता, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू असल्याचा दावा त्यांनी के ला. आतापर्यंत २० हून अधिक दुकानदारांवर कारवाई झाली असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

दुकानदारांची अशीही शक्कल

बुधवारी दुपारी टाळेबंदी लागू झाल्यानंतर औषधांची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद राहणार असा आदेश असतांनाही मेनरोडसह भद्रकाली परिसरात कापड दुकानांसह अन्य दुकाने सुरू होती. महापालिका तसेच पोलिसांच्या दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी दुकानदारांनी दुकानाचा दरवाजा बंद ठेवत बाहेरील बाजूला कर्मचाऱ्यास उभे केले. ग्राहक दुकानासमोर रेंगाळला की त्याची विचारपूस करत खातरजमा करत त्या ग्राहकाला दरवाज्यासमोर विशिष्ट सांकेतिक निशाणी करत किंवा अन्य ठिकाणी नेऊन खरेदी करण्यासाठी सोडले जात होते.