नायलॉन व चिनी धाग्यांचा वापर रोखण्यासाठी पोलिसांचा इमारतींच्या गच्चीवर मोर्चा

पूर्वापार चालत आलेल्या धोबी, येवला या पतंगींसह गरूड, मिकी माऊस, विमान आदी प्रकारच्या पतंगांची मकरसंक्रांतीला आकाशात एकच गर्दी होणार आहे. या पतंगोत्सवावर जसा निवडणुकीचा रंग चढणार आहे तशी सुरक्षेच्या दृष्टीने पतंगाची दोर पोलिसांच्या हाती राहणार आहे. आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, काही राजकीय पक्षांच्या नेत्यांची छबी पतंगीवर झळकत आहे. यंदा नायलॉन व चिनी धाग्यावर बंदी असून आजवर विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई झाली असताना या दिवशी पोलिसांचा मोर्चा पतंगोत्सवात या धाग्याचा वापर रोखण्यासाठी इमारतींच्या गच्चींवर वळणार आहे.

आबालवृद्धांसह बच्चे कंपनीची पतंग व मांजा खरेदीसाठी रविवार कारंजा, घनकर लेन, शनिवार पेठ, कानडे मारुती व भद्रकाली परिसरातील प्रमुख दुकानांवर गर्दी झाली आहे. नायलॉन चिनी मांज्याचे वाढते प्रस्थ, त्यामुळे होणाऱ्या दुखापती पाहता जिल्हा व पोलीस प्रशासनाने नायलॉन व चिनी मांज्यावर बंदी आणली आहे. हा धागा बाजारातून बाद करण्यासाठी पर्यावरणप्रेमी आग्रही आहेत. परंतु, चोरी छुपे त्याची विक्री होत असल्याचे गेल्या काही दिवसातील पोलीस कारवाईतून समोर आले. या धाग्याचा वापर करणाऱ्यांवर पोलीस नजर ठेवणार आहेत. मकरसंक्रांतीला या धाग्यांचा वापर करणाऱ्या बालकांच्या पालकांवर कारवाईचा इशारा पोलीस यंत्रणेने आधीच दिला आहे. यामुळे पतंगोत्सवाचा आनंद घेताना धोकादायक धाग्याचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, संक्रातीचा गोडवा वाढविणाऱ्या तिळगुळाच्या लाडूंची खरेदी पूर्वसंध्येला सुरू झाली. बहुतांशी घरात हे लाडू अथवा वडय़ा तयार केल्या जातात. बाजारात तिळगूळ लाडू, वडय़ा, तिळाची पोळी, राजगीरा व तीळ यांचे मिश्रण असलेले लाडू असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. साखर हलवा आणि लाडूला ग्राहकांची पसंती आहे. मकरसंक्रांतीचे औचित्य साधून निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना मतदारांशी मधुर संवाद साधण्यास खास निमित्तही मिळाले आहे.

२५ हजाराचा नायलॉन मांजा जप्त, विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे

प्रशासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी त्याची विविध दुकानांतून बेकायदेशीररीत्या विक्री सुरूच आहे. ही विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर शहर पोलीस कारवाई करत असून वेगवेगळ्या कारवाईत मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करत २४ हजार ८०० रुपये किमतीचा घातक नायलॉन व चिनी मांजा जप्त करण्यात आला. मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले. उपनगरच्या इच्छामणी जनरल स्टोअर्समध्ये नायलॉन मांजा विक्री केला जात होता. या दुकानातून २१ नायलॉन मांजाचे रीळ जप्त करण्यात आले. तसेच चिनी मांजाही होता. पोलिसांनी हे साहित्य जप्त करत संशयित नीलेश खत्रीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दूध बाजार परिसरात पतंग विक्रीच्या दुकानातून पाच नायलॉन मांज्याचे रीळ जप्त करण्यात आले. या प्रकरणी संशयित देवेंद्र सहाणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राधिका लॉटरी दुकानाशेजारी असलेल्या सचिन पतंग स्टॉलमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या कुणाल मिसाळ या विक्रेत्यावर गुन्हा दाखल झाला. सिडकोतील उत्तमनगर येथील सिडको महाविद्यालया समोरील एका घरात नायलॉन मांजा विक्री करतांना मुरलीधर खैरे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच ठिकाणी गोपाळ ठाकरे याच्याकडून ११०० रुपये किमतीचा बंदी असलेला नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. या सर्व कारवाईत २५ हजारांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.

मुलांच्या आवडीसह राजकीय पतंगाचाही संचार

बाजारात विविध प्रकारातील पतंगी लक्ष वेधून घेत आहे. गरुड, घुबड, सापाच्या आकारातील चिनी पतंगीचे प्रमाण कमी आहे. त्यास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्या पतंगींची विक्री कमी केल्याचे विक्रेते सांगतात. बच्चे कंपनीची आवड लक्षात घेता प्लास्टिकच्या पतंगीवर छोटा भीम, छोटा हनुमान, बार्बी, डोरोमन असे कार्टून्स लावण्यात आले आहे. आगामी निवडणुका पाहता, राजकीय पक्ष चिन्हे, नेते असलेले काही पतंगी बाजारात दाखल झाल्या आहेत. बाजारात सर्वसाधारणपणे दोन रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत कागदी पतंगी आणि कापडी पतंगी ५०० ते १००० रुपयांपर्यंत विक्रीस आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पतंगींच्या किमतीत फारशी वाढ झाली नाही. पतंगप्रेमींकडून पांडा, बरेली, मैदानी, फरिदाबेद आदी मांज्यांना मागणी असल्याचे सांगण्यात आले.