प्रबोधिनीतील दीक्षांत सोहळ्यात दत्ता पडसलगीकर यांचे आवाहन

नाशिक : खडतर प्रशिक्षण घेऊन पोलीस सेवेत दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी देशहितासाठी समाजाचे सेवक म्हणून कार्य करावे, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी केले. येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक सत्र ११६ च्या दीक्षांत संचलनाप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक महत्त्वाचा घटक असल्याचे पडसलगीकर यांनी नमूद केले. प्रबोधिनीत मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करून उत्कृष्ट सेवा द्यावी. पोलीस दलात समाविष्ट झाल्यानंतर संपूर्ण राष्ट्राला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांची असल्याने त्या अनुषंगाने कार्य करावे. या सत्रात २५ सागरी दलातील अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. दहशतवादी कारवायांचा सामना करण्यासाठी त्यांचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रबोधिनीत शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग मोर्चे, आंदोलनांचे नियंत्रण करतांना तसेच गुन्ह्य़ाची उकल करतांना होणार आहे. पोलीस अधिकारी म्हणून काम करताना दलाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोर्जे यांनी या सत्रात एकूण १७७ प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण पूर्ण केल्याची माहिती दिली. त्यात १४५ पुरुष आणि सात महिला तसेच २५ सागरी पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व जण नऊ महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन पोलीस सेवेत रुजू होत आहेत. अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारी ही राज्यातील एकमेव संस्था आहे. या प्रशिक्षणाचा जनसेवेसाठी उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, परिक्षेत्र महानिरीक्षक छेरींग दोर्जे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस अधीक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते. प्रारंभी, प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी शानदार संचलन केले. संचलनाचे नेतृत्व चैताली गपाट यांनी केले.

प्रशिक्षणादरम्यान उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून चैताली गपाट यांना मानाची तलवार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनाच सवरेत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थी म्हणून यशवंतराव चव्हाण चषक, कायद्यातील अभ्यासासाठी दिला जाणारा डॉ. बी. आर. आंबेडकर चषक, महिला प्रशिक्षणार्थींना दिला जाणारा अहिल्याबाई होळकर चषक आणि आंतरवर्ग प्रशिक्षणासाठी दिला जाणारा सावित्रीबाई फुले चषक, आधुनिक तंत्रज्ञान आणि बेकायदेशीर जमाव हाताळणीसाठी उत्कृट प्रशिक्षणार्थी, अभ्यासासाठी सिल्व्हर बॅटन पुरस्काराने गौरविण्यात आले. अमितकुमार कर्पे यांना द्वितीय क्रमांकाचा सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पुरस्कार तर योगेश कातुरे यांना सवरेत्कृष्ट वर्तणुकीसाठी एस. जी. इथापे पारितोषिक प्रदान करण्यात आले. अजयकुमार राठोड यांनी शारीरिक कवायत, संचलन आणि गणवेश असे सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी दिले जाणारे तीन पुरस्कार पटकावले. गुन्हेगारीशास्त्र आणि पिनालॉजी विषयातील पुरस्कार विनोद शेंडकर तर नेमबाजीसाठीचा पुरस्कार सचिन सानप यांना प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दलचा पुरस्कार विजय राऊत यांना देण्यात आला.

चैताली गपाट यांचा विलक्षण प्रवास

सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसह अनेक चषकांच्या मानकरी ठरलेल्या चैताली गपाट या मुळच्या बुलढाण्याच्या. बारावीनंतर विज्ञान शाखेची पदवी घेऊन त्यांनी पुढे कला शाखेची पदवी प्राप्त केली. विधी शाखेतील पदवी मिळवून त्या सध्या एलएलएमही करत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील चैताली या २०१० मध्ये भरती प्रक्रियेतून पोलीस दलात  दाखल झाल्या. पुणे पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या चैताली यांनी २०१६ मध्ये महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या. चैताली यांचे पती खासगी नोकरी करतात. पोलीस उपनिरीक्षक बनल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चैताली यांनी या पदावर आपल्याला थांबायचे नाही तर भविष्यात पोलीस उपअधीक्षक व्हायचे असल्याचे सांगितले.