मार्गदर्शन, अडचणींचे निराकरणाची जबाबदारी; पर्यटक पोलीस वाहनाची व्यवस्था

तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असणाऱ्या नाशिकमध्ये गेल्या काही वर्षांत वाईनरीज्ला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे पर्यटक म्हणजे शहराच्या आर्थिक विकासाला गती देणारा घटक. त्यांची सुरक्षितता जपण्याच्या उद्देशाने शहर पोलिसांनी खास स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. या माध्यमातून पर्यटकांना मार्गदर्शन करण्याबरोबर त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्याची जबाबदारी पोलिसांनी स्वीकारली आहे. या उपक्रमासाठी निर्मिलेल्या नाशिक शहर पर्यटक पोलीस वाहनाचे उद्घाटन मंगळवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

राम नवमीचे औचित्य साधून काळाराम मंदिर येथे या उपक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी आ. बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही अभिनव संकल्पना मांडली. त्यास पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य मिळाले. कोणत्याही शहराची प्रतिमा पर्यटकांना कशी वागणूक मिळते यावर निश्चित होते. सिंहस्थ काळात नाशिकमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते. बाहेरगावहून येणाऱ्या पर्यटकांना शहरातील ठिकाणांची पुरेशी माहिती नसते. तेव्हा रिक्षाचालकांकडून भाविकांची मोठय़ा प्रमाणात लूट झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. बाहेरगावहून आलेले पर्यटक दिसले की, रिक्षांचे दर दुप्पट वा तिप्पट होतात. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. भोजन, निवास आदींबाबतही पर्यटक अनभिज्ञ असतात. या अडचणी लक्षात घेऊन त्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी पर्यटक पोलीस पथकामार्फत निभावली जाणार आहे.

पर्यटन विकास महामंडळाकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण पर्यटकांना येणाऱ्या अडचणी, व्हिसा, निवास, भोजन व्यवस्था, पर्यटन स्थळांची माहिती याबद्दल हे पथक माहिती देईल. पर्यटकांसाठी लवकरच मदतवाहिनी क्रमांकही जाहीर करण्यात येणार आहे. पर्यटकांशी या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना आवश्यक ती सर्व माहिती देण्यात येईल. पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली एक अधिकारी व सात कर्मचाऱ्यांचा पर्यटक पोलीस पथकात समावेश आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पर्यटन विकास महामंडळाने शहरातील पर्यटनस्थळांची माहिती व किमान कौशल्याचे प्रशिक्षण दिले आहे.

या पथकासाठी खास वाहन तयार करण्यात आले आहे. या वाहनात ध्वनिक्षेपक यंत्रणा लावण्यात आली असून पर्यटकांच्या सूचना, तक्रारी, शेरा यासाठी पुस्तिकाही ठेवण्यात आली आहे. वाहनावरच मदतवाहिनी क्रमांकही दर्शनिय भागावर नमूद करण्यात आला आहे. पर्यटन विकास महामंडळ व पोलीस आयुक्तालयाची माहितीपत्रके पर्यटकांसाठी उपलब्ध राहतील.

प्रमुख पर्यटन स्थळांवर नजर

शहरातील रामकुंड, गंगाघाट, तपोवन, काळाराम मंदिर, सोमेश्वर, बालाजी मंदिर, सीता गुंफा, लक्ष्मण रेखा, बोटॅनिकल गार्डन, फाळके स्मारक, नवश्या गणपती, पांडवलेणी, मुक्तीधाम आदी ठिकाणी पथक गस्त घालून नजर ठेवणार आहे. संवेदनशील पर्यटन स्थळांवर अधिक्याने लक्ष दिले जाईल. पर्यटकांना मार्गदर्शन, त्यांच्याविरुध्द घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध, संशयित वस्तू व व्यक्ती यांच्याकडे बारकाईने लक्ष ठेवून दहशतवादी कारवायांना आळा घालण्याचे काम हे पथक करणार आहे.