अनिकेत साठे

गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने व्यापाऱ्यांकडून २ कोटी परत; महिनाभरात ६०० अर्ज

मे महिन्यात दगू ढवळे यांनी लासलगावच्या व्यापाऱ्याला ११३ क्विंटल मका विकला होता. चार महिने उलटूनही त्यांना मक्याचे दीड लाख रुपये मिळाले नाही. व्यापाऱ्याने दाद दिली नाही. द्राक्ष, डाळिंब, केळी आदी कृषिमालाच्या खरेदीत शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे हे प्रकार नवीन नाहीत. आजवर कोटय़वधींचा कृषिमाल घेऊन व्यापारी पसार झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. यातील बरेचसे परप्रांतांतून येत असल्याने त्यांचा थांगपत्ता लागण्यास मर्यादा येतात. व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी विशेष मोहीम हाती घेतली.

महिनाभरात थोडेथोडके नव्हे तर, ६०० अर्ज प्राप्त झाले. फसवणुकीची रक्कम होती जवळपास १९ कोटंी. या अनुषंगाने ९७ गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने काही व्यापाऱ्यांनी तातडीने दोन कोटींहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांना दिली. १०७ व्यापारी तीन कोटी रुपये देण्यास तयार झाले. या मोहिमेमुळे बुडीत होऊ पाहणारी रक्कम शेतकऱ्यांना मिळू लागली.

सप्टेंबरच्या सुरुवातीला विशेष पोलीस महानिरीक्षक पदाचा पदभार डॉ. दिघावकर यांनी स्वीकारला. तेव्हाच त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. परिक्षेत्रात अशा किती तक्रारी आलेल्या आहेत, याची माहिती मागविण्यात आली. स्वत:चा वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करत सर्वसामान्यांना अडचणींबाबत थेट संपर्क साधण्याचे आवाहन दिघावकर यांनी केले. शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी राबविलेल्या मोहिमेचे फलित महिनाभरात दृष्टिपथात आले आहे. शेतकरी कर्ज काढून द्राक्ष, डाळिंब, केळीसह तत्सम कृषिमाल पिकवतो. व्यापारी बनावट धनादेश देऊन माल घेऊन पलायन करतात. कष्टाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी कित्येक वर्षे मागे फेकला जातो. नाशिकमध्ये द्राक्ष, डाळिंब आणि जळगावमध्ये केळी खरेदीत फसवणुकीचे असे प्रकार वारंवार घडतात. शेतकऱ्याने पोलिसांकडे दाद मागितल्यास १३८ अन्वये न्यायालयात दावा दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. यंत्रणेची ही कार्यपद्धती डॉ. दिघावकर यांनी बदलली.

आठ दिवसांची मुदत..

शेतकऱ्याची रक्कम देण्यासाठी व्यापाऱ्यास आठ दिवसांची मुदत द्यायची. या काळात पूर्तता न झाल्यास संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करायचा. महिनाभरात प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात ९२, जळगाव जिल्ह्यात तीन, नंदुरबार आणि नगर जिल्ह्यात प्रत्येकी एक असे एकूण ९७ गुन्हे व्यापाऱ्यांविरुद्ध दाखल झाले आहेत. कारवाईच्या सत्रामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. अनेक महिन्यांपासून कृषिमालाचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांनी दोन कोटींहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांना दिली. यात मका विक्री करणाऱ्या दगू ढवळे यांचाही समावेश आहे. ढवळे यांच्या अर्जावरून आराध्य ट्रेडिंगच्या नवनाथ होळकर या व्यापाऱ्यास निफाड पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. त्याच्याकडून काही रक्कम रोख तर उर्वरित धनादेश स्वरूपात ढवळे यांना मिळाली. धनादेश न वटल्यास व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाईची तजवीज ठेवण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांसाठी नियमावली

शेतकरी फसवणुकीबाबत नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ५५९ अर्ज प्राप्त झाले. फसवणुकीची रक्कम १८ कोटी १३ लाखहून अधिक आहे. जळगाव जिल्ह्यात १७ शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या. त्यांची फसवणुकीची रक्कम सुमारे २७ लाख रुपये आहे. नंदुरबार जिल्ह्यात १३, अहमदनगरमधील दोन आणि धुळे जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी केल्या. नाशिक परिक्षेत्रात असे एकूण ५९३ अर्ज प्राप्त झाले. फसवणुकीची रक्कम १८ कोटी ६७ लाखहून अधिक होती. महिनाभरात या अर्जावर कारवाई करून ९७ गुन्हे दाखल करण्यात आले. १३३ व्यापारी पैसे देण्यास तयार झाले. यातून दोन कोटी ७४ हजार ५८२ रुपये शेतकऱ्यांना मिळाले. २५ लाखांची रक्कम व्यापाऱ्यांनी परस्पर शेतकऱ्यांना दिली. सव्वातीन कोटींची रक्कम नजीकच्या काळात परत करण्याची तयारी व्यापाऱ्यांनी दर्शविली आहे. कृषिमालाच्या खरेदी-विक्रीत पुढील काळात असे प्रकार रोखण्यासाठी नियमावली जाहीर केली असल्याचे डॉ. दिघावकर यांनी म्हटले आहे. त्याअंतर्गत व्यापाऱ्याला त्याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात कागदपत्रांसह द्यावी लागेल. तो ज्या भागातून आला आहे, तेथील आणि स्थानिक पातळीवरील दोन व्यक्तींचे संदर्भ देणे त्यास बंधनकारक केले जाणार आहे.