पोलिसांकडून बाल गुन्हेगारांना सुधारण्याचा प्रयत्न
नकळत्या वयात एखाद्याच्या माथी बाल गुन्हेगार म्हणून शिक्का बसला तर समाजही त्याला सहजासहजी स्वीकारत नाही. सामाजिक अवहेलना आणि कुटुंबाकडून होणारी हेळसांड यामुळे ही विधिसंघर्षित बालके गुन्हेगारी विश्वातच अडकत जातात. ही बाब लक्षात घेऊन नाशिक परिमंडल दोनच्या वतीने मंगळवारी विधिसंघर्षित बालकांना मार्गदर्शन करण्यात आले. ‘पोलीस समुपदेशक’ ही पोलिसांची नवी भूमिका पालक व विधिसंघर्षित बालकांच्या पचनी न पडल्याने त्यांची विशेष बडदास्त ठेवत कार्यशाळा पार पाडण्याची कसरत यंत्रणेला करावी लागली. मात्र यातून नागरिक, संशयित, गुन्हेगार, नातेवाईक यांच्यातील संवादाची दरी कमी होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
परिमंडल दोनच्या वतीने नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील दरी कमी व्हावी, संवाद साधला जावा यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. परिसरात काही टोळ्या सक्रिय आहेत. या पाश्र्वभूमीवर, उपनगर, नाशिकरोड, अंबड, सातपूर, इंदिरानगर, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मागील वर्षभरात विविध गुन्’ाातील विधिसंघर्षित बालकांसाठी समुपदेशनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यासाठी पोलिसांनी दोन दिवस प्रत्येक पोलीस ठाण्यातील सोनसाखळी चोरी, दरोडे, मारहाण, खून, खुनाचा प्रयत्न, दंगल घडवून आणणे अशा विविध गंभीर गुन्’ाात अडकलेल्या बालगुन्हेगारांचा शोध घेतला. त्यांच्या घरी जाऊन तर काहींना दूरध्वनीवरून कार्यशाळेविषयी माहिती देण्यात आली. मात्र पोलीस असे काही करू शकतात, याच्यावर ती बालके आणि त्यांच्या पालकांचा विश्वास नसल्याने अध्र्याहून अधिक बालके रात्रीतून पळून गेली. या सर्वाचा ठावठिकाणा शोधत पोलिसांनी सर्व मुलांना आपल्या वाहनातून, काही पालकांनी विरोध केल्यावर त्यांनाही सोबत घेत इंदिरानगर पोलीस ठाणे गाठले. या ठिकाणी पोहचल्यावर सर्वाची एका वहीत नोंद करून घेत अन्य तपशीलही नोंदविला गेला.
दरम्यान, समुपदेशक वैशाली बालाजीवाले यांनी विधिसंघर्षितांशी संवाद साधला. यासाठी ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ सादरीकरणातून त्यांनी अपयशातून यशाकडे कसे जाता येईल, आयुष्यात अडचणी येतात, मात्र त्यांचा सामना कसा करावा, व्यसनमुक्ती, चैन-मौजमजा करणाऱ्या मित्रांपासून सावध राहाणे, मोहावर नियंत्रण ठेवा, चांगला व्यक्ती कसा घडू शकतो, सुजाण नागरिकांची कर्तव्ये व अधिकार यावर मार्गदर्शन केले. त्यांच्याशी झालेल्या प्रश्नोत्तरात ४० टक्क्यांहून अधिक बालकांना पोलीस अधिकारी व्हायचे आहे. मात्र गुन्हेगारी शिक्का बसल्याने ते कसे करता येईल याविषयी मुलांनी माहिती घेतली. दूरशिक्षण किंवा अन्य काही पर्यायांच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करावे, असा सल्ला त्यांनी दिला. पालकांनी या उपक्रमांविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्यासह अन्य अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.