चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य
नाशिक : देशातील सहकारी साखर कारखाने आणि अन्य संस्थांना पाठबळ देण्यासाठी मोदी सरकारने सहकार मंत्रालयाची मूहूर्तमेढ रोवली आहे. ज्यांना धास्ती असेल त्यांच्यामध्येच अमित शहा सहकारमंत्रि झाले म्हणून    घबराट पसरेल, असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी के ले आहे. मोदी-पवार यांच्यात भेट झाली असली तरी त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोड होण्याची शक्यता कमी आहे. नाईलाज म्हणून महाविकास आघाडीला एकत्र रहावेच लागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

शनिवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. लोकसभा, राज्यसभेचे अधिवेशन सुरू होण्याआधी काही विषयांवर मोठे नेते चर्चा करतात, यामुळे शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असावी. भाजप राष्ट्रवादीचे नेते किं वा महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षाच्या विरोधात नसल्याचे त्यांनी सांगितले. काही चुकीचे घडले नसेल तर  सक्त वसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीला घाबरण्याचे कारण नाही. चौकश्या होतील. राज्यातील अनेक नेत्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे रात्रीतूनही कुणाला अटक होऊ शकते, असा सूचक इशाराही पाटील यांनी दिला. सहकारी साखर कारखाने अनेक वर्ष नुकसानीत होते. मोदी सरकारने विविध सवलती देऊन त्यांच्या उत्पन्न वाढीस हातभार लावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची घेतलेली भेट नियमित स्वरुपाची होती. त्यात सहकार विषयावर काही चर्चा झाल्याचे वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला जाणे हा मान असतो. वारकऱ्यांनी त्याला विरोध करू नये. भले त्यांनी निदर्शने करावी, असे आवाहन त्यांनी केले. निर्बंधामुळे हातावर पोट असणाऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथील करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी नमूद के ले.

शिवसेनेशी वैर नाही

भाजप लोकहितासाठी राज्य सरकारविरोधात आंदोलन करीत आहे. त्यामुळे ती मुख्यमंत्र्यांच्या विरोधात होतात. शिवसेनेशी आमचे वैर नाही. सेना-भाजपने एकत्र निवडणूक लढवून बहुमत मिळाल्यानंतर केवळ मुख्यमंत्रिपद मिळाले नाही म्हणून सेनेने वेगळ्या विचारांच्या पक्षाबरोबर सरकार स्थापन केले. त्याचे शल्य आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात तत्व, स्वाभिमान, निष्ठा गुंडाळून ठेवले गेले आहेत. सत्ता असा ‘फेव्हिकॉल’ आहे की तो चिकटल्यास सोडणे अशक्य असते. आजतरी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची शक्यता नसल्याचे पाटील यांनी नमूद केले.

… तरच भाजप-मनसे युती शक्य

राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहे. एकट्या राज यांच्या बळावर सरकार येणे शक्य नाही. राज ठाकरे हे व्यापक राजकारणात आले तर युती शक्य आहे, असे सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. राज यांच्याशी आमची जुनी ओळख आहे. योग आला तर त्यांना नक्की भेटेल. ते आमच्यापासून दूर गेलेले नाहीत. तथापि, मनसे परप्रांतियांबाबतचे आपले धोरण बदलत नाही, तोपर्यंत युती शक्य नसल्याची पुष्टी त्यांनी जोडली. पाटील आणि राज हे एकाचवेळी नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी हे विधान केल्याने त्यास महत्व आहे.