20 October 2020

News Flash

महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी आणि भाजपचीही कोंडी

महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी आणि भाजपचीही कोंडी

नाशिक येथे शिवसेना कार्यालयात नागरिकांच्या समस्या जाणून घेताना सहकार राज्यमंत्री दादा भुसे.

शिवसेनेचा जनता दरबार उपक्रम

नाशिकचे पालकत्व ज्या भाजपच्या मंत्र्यांकडे आहे, ते सिंहस्थानंतर अंतर्धान पावल्याचा आक्षेप घेणाऱ्या शिवसेनेने आता जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आपल्या मंत्र्यांना मैदानात उतरवत महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बुधवारी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यालयात पार पडलेला जनता दरबार हे त्याचेच उदाहरण. प्रदीर्घ काळानंतर झालेल्या या स्वरूपाच्या पहिल्याच उपक्रमात जवळपास ५० तक्रारी प्राप्त झाल्या. शक्य त्यांची सोडवणूक तातडीने करण्याचाही प्रयत्न केला गेला. आगामी काळात शिवसेनेचे इतर मंत्री आणि खासदार-आमदारही या माध्यमातून सर्वसामान्यांशी संपर्क साधणार आहेत. पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, सुरू झालेल्या दरबाराच्या माध्यमातून सेनेने पुन्हा भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

पालिका निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. ही निवडणूक भाजप व सेना स्वतंत्रपणे लढणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल, तेव्हा उभयतांकडून परस्परांवर शरसंधान साधले जाते. गंगापूर धरणातील पाणी जायकवाडीला सोडणे, ढासळती कायदा व सुव्यवस्था, एकलहरे औष्णिक वीज प्रकल्प, आरोग्य विद्यापीठाचे स्थलांतर अशा अनेक मुद्यांवरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊन भाजपच्या मंत्र्यांविरोधात मोर्चाही काढला होता. वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांना नाशिककडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचा आरोप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. सिंहस्थानंतर पालकमंत्री नाशिककडे फिरकत नसल्याचा आरोप संबंधितांकडून केला जातो. या घडामोडी सुरू असताना शिवसेनेने शासकीय कार्यालयांशी निगडीत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अचानक दरबाराची संकल्पना प्रत्यक्षात आणत भाजप मंत्र्यांना खिंडीत पकडण्याची तयारी केल्याचे लक्षात येते.

सामान्य जनतेला शासन स्तरावरील अडचणी सोडविण्यासाठी बरीच धडपड करावी लागते. या अडचणी लक्षात घेऊन शिवसेना प्रत्येक बुधवारी जनता दरबाराचे आयोजन करणार आहे. त्या अंतर्गत पहिला उपक्रम बुधवारी दुपारी सहकार राज्यमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी महानगरप्रमुख अजय बोरस्ते व जिल्हाप्रमुख विजय करंजकर उपस्थित होते. वेगवेगळ्या भागातून आलेल्या नागरिकांनी आपले प्रश्न मांडले. सिन्नर नागरी पतसंस्थेचे प्रशासक गरजुंऐवजी धनदांडग्यांना ठेवी परत करत असल्याची तक्रार अ‍ॅड. शिवराज नवले, संजय चव्हाणके यांनी केली. विशेष शिक्षक म्हणून २०१२ पासून नियुक्ती मिळूनही आजवर वेतन मिळाले नसल्याची व्यथा सुनीता बडगुजर यांनी मांडली. समाजकल्याण विभागाच्या अपंगांसाठी काही योजना आहेत. त्यासाठी दोन ते तीन वर्षांत अनेकांनी अर्ज सादर केले. जिल्हा परिषद व उपरोक्त कार्यालयात खेटा मारुनही त्यांना लाभ मिळाला नाही. त्यांचे अर्ज बाद झाल्याचे सांगितले जात असल्याची तक्रार संजय चव्हाण यांनी केली. चांदवड येथे लोक न्यायालयाने निर्णय घेऊनही जमिनीचा कब्जा मिळत नसल्याची तक्रार बापू चौरे यांनी मांडली.

कोणी जमिनीवर पडलेल्या आरक्षणाची तक्रार घेऊन तर कोणी भूमी अभिलेख विभागातील तक्रारी घेऊन आले होते. पंचवटीतील शेरी मळा भागात वास्तव्यास असलेल्या २५ ते ३० महिला व पुरूषांनी महापालिका, बांधकाम व्यावसायिक आणि पोलीस यंत्रणेकडून दबाव टाकला जात असल्याची तक्रार केली. शेरी मळा भागात गुंठेवारीच्या जमिनीवर ४० ते ५० वर्षांपासून आम्ही वास्तव्यास आहोत. परंतु, ही जागा बिल्डरला देण्यासाठी पालिकेने आमची घरे अतिक्रमित ठरवल्याची तक्रार संबंधितांनी केली. या प्रक्रियेत पोलीस चौकशीसाठी वारंवार बोलावून त्रास देत असल्याची बाब महिलांनी मांडली.

काही तक्रारींवर तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कार्यवाहीच्या सूचना दिल्या तर काही प्रकरणे इतर विभागांशी संबंधित असल्याने त्या पुढील कार्यवाहीसाठी पाठविल्या जाणार असल्याचे भुसे यांनी नमूद केले. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांवर जबाबदारी सोपविली आहे. त्या अनुषंगाने दर पंधरा दिवसांनी आपण सेना कार्यालयात नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहोत. शेरी मळा भागातील प्रश्नावर भुसे यांनी पालिका आयुक्तांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला.

संबंधितांच्या तक्रारीचे निराकरण करण्याची सूचना त्यांनी केली. पालिका निवडणुका लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू झाला काय, यावर जिल्हाप्रमुख करंजकर यांनी उत्तर दिले. जनतेने प्रश्न सोडविण्यासाठी सेना नेहमीच प्रयत्न करते. यापूर्वी सेना कार्यालयातून हे काम केले गेल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2016 4:38 am

Web Title: political party planning for nashik municipal corporation
Next Stories
1 कॅनडा कॉर्नर चौकातील ओटय़ांमुळे अपघातांना निमंत्रण
2 पतसंस्थांच्या प्रभावी नियमनासाठी लवकरच नवीन कायदा
3 मोजक्या महाविद्यालयांकडून अतिरिक्त शुल्क परत
Just Now!
X