तळेगाव प्रकरणानंतर जिल्ह्यात उद्भवलेल्या तणावाची स्थिती निवळण्यासाठी सर्व समाजघटकांनी एकत्र नांदायला हवे. स्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून राजकीय नेत्यांनी समतोल बाळगायला हवा, असे आवाहन छत्रपती संभाजी राजे यांनी केले. या संवेदनशील विषयात राजकारण होत असल्याचे त्यांनी सूचित केले. महाराष्ट्राला महापुरुषांनी विचारांचा वारसा दिला आहे. त्यांचे विचार आत्मसात करण्याची खरी गरज आहे. ते साध्य न झाल्यास महापुरुषांचे नाव घेण्याचाही आपणास अधिकार राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पीडित बालिकेच्या आई-वडिलांची बुधवारी त्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पीडित बालिकेची प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणात तातडीने आरोपपत्र दाखल करणे, खटला जलदगती न्यायालयात चालविणे व संशयिताविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. शहर व ग्रामीण भागात शांतता प्रस्थापित होणे आवश्यक आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी सर्व समाजघटकांना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या विचारांचा वारसा जोपासणे गरजेचे आहे. राज्यात सामाजिक विषमता वाढत आहे. विशिष्ट समाजाचे मोर्चे निघणे अनुचित नाही. पण त्यातून द्वेषाची भावना पसरणे योग्य नाही. नाशिकमधील स्थितीबद्दल पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. त्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले. सर्व समाजघटक व राजकीय नेत्यांनी शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मराठा क्रांती मोर्चात राजकीय पुढाऱ्यांना समाजाने दूर ठेवले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय संसदेत मांडला जाईल. तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने आरक्षणाची मर्यादा वाढवून ते दिले गेले, त्याचा अभ्यास करावा लागेल. ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याचा अनेक ठिकाणी दुरुपयोग होतो. त्यामुळे त्याचा गैरवापर होणार नाही यासाठी त्यात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले.