18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

जिल्ह्य़ातही प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी होणार

नाशिक जिल्ह्यातही फटाके व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.

प्रतिनिधी, नाशिक | Updated: October 11, 2017 3:20 AM

नाशिक जिल्ह्यातही फटाके व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.

संकल्प राबविण्यासाठी  शिक्षण विभागाला अंनिसचे सहकार्य

दिवाळी म्हटली की, डोळ्यासमोर येते ती फटाक्यांची आतषबाजी आणि त्यातून होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण.  हे टाळण्यासाठी शिक्षण विभागाने ‘प्रदूषणमुक्त’ दिवाळीचा संकल्प केला आहे. त्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धानिर्मूलन समितीचे सहकार्य घेण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्य़ातही हा संकल्प राबविण्यात येणार असून प्रदूषण, कचरा संकलन आणि स्वच्छता या त्रिसूत्रीवर भर देण्यात येणार आहे.

गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणाविरोधात राज्यभर ‘फटाकेमुक्त दिवाळी’ अभियान हाती घेण्यात येत आहे. अंनिसचे कार्यकर्ते प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करत आहे. शाळांमध्ये फटाक्याचे दुष्परिणामाचे पत्रक वाटणे, व्याख्यान देणे, विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र भरून घेणे, पथनाटय़ाचे सादरीकरण, निबंध व चित्रकला स्पर्धा आदी उपक्रम हाती घेत प्रबोधनावर भर दिला जातो. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायुप्रदूषण, अपघात, करोडो रुपयांचा चुराडा, पर्यावरणाचा ऱ्हास, बालमजुरीचा प्रश्न याकडे लक्ष वेधले जाते. विद्यार्थ्यांना फटाके मुक्त दिवाळी साजरी करून किमान १०० रुपये वाचवा आणि वाचविलेल्या पैशातून चांगली पुस्तके, खेळणी, भेटवस्तू, मिठाई, गरिबांच्या घरी फराळ देणे, त्यांना आर्थिक तसेच शैक्षणिक मदत करणे आदी कामे करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. अंनिसच्या प्रयत्नांमुळे राज्यातील एक हजार ४७० शाळांमध्ये पाच लाख ९१ हजार विद्यार्थ्यांनी अभियानात सहभागी होत १६ कोटी ९० लाख रुपयांच्या बचतीचा संकल्प केला आहे. दरम्यान, अंनिसच्या या अनोख्या उपक्रमाची व्याप्ती पाहता तसेच याबाबत पर्यावरणाविषयी जागृती निर्माण होत असताना मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान हाती घेतले आहे.

प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी शपथ

नाशिक जिल्ह्यातही फटाके व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. १३ ऑक्टोबर रोजी परिपाठाच्या वेळी महापालिकेच्या तसेच सर्व माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फटाके तसेच प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी शपथ देण्यात येणार आहे. सुट्टी काळात आपल्या शाळा परिसरात फटाके फोडल्यानंतर होणारा कचरा संकलित करण्यात येणार आहे तसेच परिसरात सजावटीमुळे झालेल्या कचऱ्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याचे शिक्षण मंडळाचे अधिकारी नितीन उपासनी यांनी सांगितले.

First Published on October 11, 2017 3:20 am

Web Title: pollution free diwali will be celebrated in the nashik district