गरीब दुर्बल घटकातील प्रत्येकाला स्वत:चे घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून देशात तीन कोटी घरकूल बांधण्यात येणार आहेत. ही योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासन यंत्रणेने काम करावे, असे आवाहन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नाशिक येथील आडगावमध्ये ४४८ सदनिकांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन डॉ. भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, आमदार बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, म्हाडाचे मुख्याधिकारी रमेश मिसाळ आदी उपस्थित होते.
डॉ. भामरे म्हणाले, आज एकाचवेळी महाराष्ट्रातील २० प्रकल्पांतील ४२ हजार सदनिकांच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे झाला. २०२२ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होतील. या वर्षापर्यंत देशातील सर्वांना हक्काचे घर मिळेल. प्रत्येक गरीबाला पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालयाची व्यवस्था व रस्ते यांसह पक्के घर देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे, असेही भामरे यांनी सांगितले. झोपडपट्टयांचा ‘आहे तेथेच’ पुनर्विकास, कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती, खाजगी भागिदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान अशा चार गटांमध्ये योजना राबवण्यात येणार आहे. योजनेमध्ये अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबातील व्यक्तीच्या मालकीचे देशातील कोणत्याही भागात घर नसावे, असेही ते पुढे म्हणाले.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. म्हणाले, अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतिवर्ष आर्थिक उत्पन्न मर्यादा तीन लाख रुपये आहे. ग्रामीण भागात असलेल्या या योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांसाठी नागरीक्षेत्रातही लागू करण्यात आल्या आहेत. मुख्याधिकारी मिसाळ म्हणाले, या प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून प्रती घरकूल दीड लाख रुपये व राज्य सरकारमार्फत एक लाख रुपये अनुदान देण्यात येईल. यावेळी आमदार सानप यांनीही मनोगत व्यक्त केले. नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने आडगावच्या गट क्रमांक १५६० मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 14, 2017 7:31 pm