नाशिक पोलीस आयुक्तालय पथदर्शी प्रकल्प राबविणार

गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती नदीत विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण होण्यासह मूर्तीची अवहेलना झाल्याची उदाहरणे आहेत. पीओपीच्या मूर्ती वर्षांनुवर्षे पाण्यात विरघळत नसल्याचे संकट आता दूर होणार असून त्याचे उदाहरण येथील एचपीटी महाविद्यालयाने दाखवून दिले आहे. महाविद्यालयाच्या पाचदिवसीय गणेशोत्सवाचा समोराप शुक्रवारी पर्यावरणपूरक शैलीत मूर्ती विसर्जनाने करण्यात आला. अमोनियम बायकॉर्बोनेट असलेल्या पाण्यात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. या नव्या विसर्जन पद्धतीनुसार पीओपीच्या मूर्तीचे योग्य व्यवस्थापन करता येणे शक्य होणार आहे. नाशिकमध्ये हा उपक्रम पथदर्शी म्हणून यंदा पोलीस आयुक्तालयांकडून राबविण्यात येणार आहे

. पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने या विषयावर दीड वर्ष संशोधन केले आहे. घरगुती आणि मोठय़ा पीओपी मूर्तीचे पर्यावरण स्नेही विसर्जनाचा शोध यातून लागला आहे. पीओपीची मूर्ती पाणी आणि अमोनियम बायकार्बोनेटमध्ये विसर्जित केल्यास दोन दिवसांत मूर्ती पूर्णपणे विरघळते. हे मिश्रण बगीचा आणि शेतात खत म्हणून वापरता येणं सहजशक्य आहे. या संशोधनामुळे आता पीओपी मूर्तीचेही पर्यावरणस्नेही विसर्जन शक्य झाले आहे. याचे प्रात्यक्षिक व पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात म्हणून एचपीटी महाविद्यालयात शुक्रवारी हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ बेंडाळे, सुरेश नखाते, आशीष कुलकर्णी, अपूर्व इंगळे यांनी केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी अशा उपक्रमांसाठी तरुणाईने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

अशी आहे प्रक्रिया

मूर्ती बुडेल इतक्या पाण्यात एक पाकीट अमोनियम बायकार्बोनेट पावडर एकत्रित करावी. पीओपी मूर्तीवरील फुले व धातूची सजावट काढून या मिश्रणात मूर्ती विसर्जित करावी. दोन दिवस अधूनमधून हे मिश्रण ढवळत राहावे.  दोन दिवसांनंतर मूर्ती पूर्णपणे विरघळून खाली मूर्तीचा गाळ व वर पातळ द्रव राहील. गाळाचा वापर खडू किंवा बांधकामासाठी होऊ  शकेल. द्रव्य खत म्हणून वापरता येते. नाशिक येथील पालवी संस्था व रेनबो संस्था यांच्या एकत्रित उपक्रमात पोलीस प्रशासन मदत करत आहे. यासंदर्भात सुवर्णा पवार (९४२३१७४१४१) यांच्याकडे संपर्क साधावा.