पोस्टमन, एमटीएस प्रवर्गातील रिक्त जागा भरण्यासह प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी टपाल खात्याच्या ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन, पोस्टमन अ‍ॅण्ड एमटीएस यासह अन्य संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळेत उपोषण करत अन्न आणि पाण्याचा त्याग केला. पुढील टप्प्यात शुक्रवारी विभागीय कार्यालयासमोर दुपारी चार वाजता धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

मंगळवारी जिल्ह्य़ातील २०० हून अधिक पोस्टमन आणि अन्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. कार्यालयीन वेळेत तहान-भूक विसरत त्यांनी अखंड काम केले.

पोस्टमन, एमटीएस, मेलगार्ड आणि जीडीएसच्या थेट भरतीमार्फतच्या सर्व रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्या, १९९६ च्या फरकाचा निवृत्त कर्मचारी आणि पदोन्नती मिळालेल्या टपाल सहाय्यकांना थकबाकी त्वरीत द्यावी, ई-कॉमर्स पार्सलची नोडल वितरण पद्धत बंद करावी, आरएमएस विभागातील सेक्शन एल-३५ सुरू करावे, खातेबाह्य़ रोजंदारी कामगारांना मुख्य कामगार आयुक्तांच्या सुधारित दराप्रमाणे वेतन द्यावे, सर्कल प्रशासनाने या आधी झालेल्या वाटाघाटीमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. राष्ट्रीय सर्कल अध्यक्ष बाळकृष्ण चाळके यांनी कर्मचारी मागण्यांविषयी वेळोवेळी आवाज उठवतात, परंतु प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी उपोषण करत अखंड काम केले. शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे धरण्यात येईल. २४ रोजी सकाळी सहा ते रात्री १२ या वेळेत एक दिवसीय संप राहील आणि संयुक्त कृती समितीच्या मागण्या मान्य न झाल्यास  २१ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत संप पुकारला जाईल, असा इशारा चाळके यांनी दिला.