करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असल्याची माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या सहाय्याने विविध शिक्षणक्रमांचे ई बुक्स तथा यशोवाणी या वेब रेडिओवर प्रसारित होणाऱ्या विविध शिक्षणक्रमाच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून घरबसल्या अभ्यास कसा करता येईल, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेतील ९७ शिक्षणक्रमांना यंदा संपूर्ण राज्यभरातील जवळपास सव्वासहा लाखांहून अधिक विद्यार्थी प्रविष्ठ  आहेत. दूरस्थ शिक्षण पद्धतीने राज्यभरातील एकूण एक हजार ९३७ अभ्यास केंद्रांद्वारे या विद्यार्थ्यांच्या अध्ययन आणि शैक्षणिक समुपदेशनाचे काम सुरू आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी टाळेबंदीत विद्यार्थ्यांंना घरूनच अभ्यास करण्याची सूचना केली आहे. विद्यापीठाने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत काही वर्षांंपासून आपले अध्ययन साहित्य हे विद्यापीठाच्या  संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहे. त्यात विविध विद्याशाखेची पाठय़पुस्तके, पूरक अध्ययन साहित्य हे मोफत वाचता येते. भ्रमणध्वनीवर अभ्यासाची व्यवस्था करून देण्यात आली आहे.  तसेच जीवन कौशल्ये, स्वयंअध्ययन कौशल्ये, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, सामाजिक शास्त्र यासह विविध शिक्षणक्रमांचे ऑनलाईन समंत्रण सत्रे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर घेतली जात आहे. तसेच ‘यशोवाणी’ या वेबरेडिओवरून या विषयी माहिती दिली जात आहे.

विद्यापीठाच्या एकुण १५२ विविध शिक्षणक्रमांसाठी सहा लाख २४ हजार २६० विद्यार्थी प्रविष्ट असून, त्यात नवीन प्रविष्ट विद्यार्थी संख्या पाच लाख ७० हजार तर ५४ हजार २६० विद्यार्थी पुन:परीक्षार्थी आहेत, अशी माहिती प्रभारी परीक्षा नियंत्रक रवींद्र ठाकरे यांनी दिली. इतर पारंपरिक विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर मुक्त विद्यापीठाचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे ठाकरे यांनी नमूद केले आहे.

मुक्त विद्यापीठाकडून १० कोटींची मदत

करोना विरुद्धच्या लढाईत आर्थिक मतदीचा हात देण्यासाठी विद्यापीठे, विविध क्षेत्रातील कामगार संघटना पुढे सरसावल्या आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० कोटी रुपये देण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.