शहरात दोन तासांपेक्षा अधिक वेळ वीज पुरवठा खंडित

नाशिक : सलग तिसऱ्या दिवशी ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शहरालाही सायंकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. काही भागात गारपीट देखील झाली. झाडाच्या फांद्या वीज तारांवर पडल्याने अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. पुरवठा सुरळीत होण्यास दोन तासापेक्षा अधिक वेळ लागला. अकस्मात आलेल्या पावसाने सखल भागात पाणीच पाणी झाले. सुमारे तासभर झालेल्या पावसाने उकाडा बराचसा कमी होऊन वातावरणात गारठा निर्माण झाला

दोन दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागात गारपीट, अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. दिंडोरी, निफाडसह नाशिक तालुक्यास त्याने तडाखा दिला. दुपारनंतर वातावरण बदलले. सायंकाळी मेघ गर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. शहरात तासभर मुसळधार पाऊस पडला. गाराही पडल्या. दिंडोरीसह निफाडच्या काही भागात गारांसह पाऊस झाला. करोनाचे निर्बध लागू असल्याने शहरात सायंकाळी फारशी वर्दळ नसते. बाजारपेठाही बंद असल्याने जनजीवनावर परिणाम झाला नाही. पावसाचा जोर इतका होता की, काही वेळातच रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहू लागले. वादळी वाऱ्याने झाडाच्या फांद्या वीज तारांवर पडल्या. त्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. सायंकाळी उशिरा काही ठिकाणचा वीज पुरवठा पूर्ववत झाला. झाडे वा फांद्या पडून कुठेही नुकसान झाल्याची नोंद नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. अवकाळी पावसाने वातावरणाचा नूर पालटला. उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना गारव्याने दिलासा मिळाला.

पावसामुळे द्राक्षबागांसह कांदा, गव्हाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही भागात द्राक्ष बागांची छाटणी झालेली आहे. या छाटणीनंतर द्राक्ष वेलींना फुटलेल्या पालवीची पाऊस, गारपीटीने हानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. वेलीच्या पालवीचा हा भाग खराब होतो. त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार असल्याचे उत्पादक सांगतात.