पुरवठा खंडित झाल्यास संयम बाळगण्याचे आवाहन

नाशिक : महावितरणने मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणेची देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्याअंतर्गत झाडाच्या फांद्या काढण्यासह वाहिन्या व यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून ही तयारी सुरू आहे. नाशिक परिमंडळात चाललेल्या कामांमुळे ग्राहकांची तात्पुरती गैरसोय झाल्यास संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी मान्सूनपूर्व वीज यंत्रणेची दुरुस्तीची कामे सुरू होतात. यंदा करोनाकाळात शासनाने संचारबंदी लागू के ली असून त्यामध्ये सर्व नागरिक घरी आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी फक्त सेवेत

आहेत. त्यामुळे कुठलाही वीजपुरवठा खंडित होऊ  नये यासाठी या महामारीच्या स्थितीत महावितरणचे कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत. विद्युत यंत्रणांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम करायचे असल्याने त्यासाठी वीजपुरवठा खंडित करावाच लागतो. त्यामध्ये सर्व भाग किं वा विद्युतवाहिनी खंडित न करता टप्प्याटप्प्याने कामे करून तेवढय़ाच भागापुरता असलेला वीजपुरवठा खंडित करून त्या भागातील दुरुस्ती कामे केली जातात.

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊन जास्त वेळ वीजपुरवठा बंद राहू नये म्हणून दक्षता घेण्यात येत आहे. वादळी पावसात उंच वाढलेल्या झाडाच्या फांद्या विद्युत तारांवर पडण्याची तसेच त्यांना घासण्याची शक्यता असते. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. त्यामुळे अशा फांद्या तोडणे, फुटलेले पीन आणि इन्सुलेटर बदल, तपासणी आणि दुरुस्ती, रोहित्रांची ऑइल तपासणी, ऑइल गळती थांबविणे, वाहिनींचे खराब झालेले ‘लाइटनिंग अरेस्टर’ बदल करणे, भूमिगत वाहिन्यांशी संबंधित कामे, जीर्ण तारा बदलणे, उपकेंद्रातील यांत्रिक बाब, यंत्रणांची तपासणी आदी कामे सध्या करण्यात येत आहेत महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी करोनाची नियमावली पाळून ही कामे करणे आवश्यक असून ती दक्षता घेऊन गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ही कामे करण्याआधी ग्राहकांना लघुसंदेशाद्वारे पूर्वसूचना दिली जाते. कामे करताना योग्य प्रमाणात विभाजन करून त्या प्रकारे एके क भाग बंद  करून कामे केली जातात.

देखभाल-दुरुस्तीची कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडित, सुरळीत आणि सुरक्षित ग्राहक सेवेसाठी आहेत. या काळात तात्पुरता वीजपुरवठा खंडित झाल्यास थोडासा संयम राखून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.