जिल्ह्य़ातील अनेक भागात दुष्काळाचे सावट असताना कसमादे पट्टय़ात यंदा डाळिंबाला प्रतिकिलो १०० रुपये भाव मिळाला असून, आता बाजारात दाखल होणारी हंगामपूर्व अर्थात अर्ली द्राक्षेही भाव खात आहेत. बागलाण तालुक्यात पश्चिम बंगाल तसेच बांगलादेशच्या व्यापाऱ्यांनी शिवार खरेदी सुरू केली आहे. या द्राक्षांना सरासरी प्रति किलो ११० रुपये किलो दर मिळत आहे.

बागलाण तालुक्यातील शेतकरी दोन ते अडीच दशकांपासून नगदी पीक म्हणून ओळखले जाणाऱ्या डाळिंबाचे उत्पादन घेत आहे. गारपीट, अवकाळी पाऊस आणि तेल्या, मर रोगाच्या आक्रमणाने हे पीक हद्दपार होण्याच्या मार्गावर आले. डाळिंब पिकाचे संरक्षण करण्याच्या नादात अनेक जण कर्जबाजारी झाले. दुसरीकडे डाळिंबाला पर्याय म्हणून बहुतांश शेतकऱ्यांनी वातावरणाचा ताळमेळ साधत दुसरे नगदी पीक म्हणून अर्ली द्राक्ष पीक घेण्याकडे लक्ष केंद्रित केले. मागील तीन वर्षांत कसमादे पट्टय़ात द्राक्ष लागवडीत चारपटीने वाढ झाल्याची सरकारी आकडेवारी आहे. चार वर्षांपूर्वी बागलाण तालुक्यात ३५० एकर क्षेत्रावर द्राक्ष पीक घेतले जात होते. तालुक्यात या वर्षी १६०० हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष पीक उभे आहे.

प्रयोगशील द्राक्ष उत्पादकांचा तालुका म्हणून बागलाणची जगात ओळख निर्माण झाली आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी १ जूनपासून द्राक्षांची छाटणी करून द्राक्षबाग फुलविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. सध्या किकवारी खुर्द आणि बुद्रुक, अमरावतीपाडा, पारनेर, मुंगसे, द्याने, बिलपुरी, श्रीपुरवडे, दसाणे, केरसाणे, गोराणे, बिजोटे, भुयाणे येथे पश्चिम बंगाल तसेच बांगलादेशच्या व्यापाऱ्यांनी शिवार खरेदी सुरू केली आहे. थॉमसन, क्लोन दोन या वाणाची द्राक्षे प्रति किलो सरासरी ११० रुपये किलो दराने खरेदी केली जात आहेत. यंदाच्या हंगामात बाजारात द्राक्ष पाठविण्याचा पहिला मान प्रदीप देवरे या युवा शेतकऱ्याने मिळविला. एक एकरच्या द्राक्ष बागेतून देवरे यांनी सात टन द्राक्षांचे उत्पादन काढले. त्यातून सात लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले. हा भाव कायम राहिल्यास शेतकऱ्याला खर्च वजा जाता एकरी तीन ते चार लाखाचा नफा मिळतो, असे जाणकार सांगतात.

अधिक उत्पन्नामुळे धाडस

अर्ली द्राक्ष हंगाम तसा १ जूनपासून सुरू होतो. १ जूनपासून छाटणी सुरुवात होते. ती ऑगस्ट ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत केली जाते. बागलाण तालुक्यात थॉमसन, क्लोन-दोन, ताज गणेश, सोनाका, नाना पर्पल आदी वाणांचे द्राक्ष पीक घेतले जात आहे. त्यात मोसम, करंजाडी, हत्ती, कान्हेरी आणि गिरणा खोरे आघाडीवर आहे. या संदर्भात लाडूद येथील उत्पादक दौलत बोरसे यांनी हंगामपूर्व द्राक्षाचे समीकरण उलगडले. अधिक पैसा यामुळे बागलाणचा शेतकरी हे धाडस करत आहे. ११० ते १२० दिवसात हे पीक येते. मागील दोन वर्षांपासून निर्यातदार व्यापारी डिसेंबर, जानेवारी महिन्यात खरेदीसाठी येत आहेत. युरोप, आखाती देशात अर्ली द्राक्षाला मागणी असल्यामुळे भावही चांगले असतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.