लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्याची मागणी

नाशिक : केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी ‘आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ सध्या जिल्ह्य़ातील सरकारी रुग्णालयांमध्ये सुरू असून लवकरच ही योजना खासगी रुग्णालयांमध्ये सुरू होईल, असा दावा आरोग्य विभागाकडून होत आहे. दुसरीकडे ग्रामीणसह शहर परिसरात आयुष्यमान योजनेचे लाभार्थी कोण, याविषयी अनभिज्ञता आहे. या पाश्र्वभूमीवर सामाजिक संघटनांच्या वतीने सरकारी कार्यालयांमध्ये आयुष्यमानच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

sharad pawar discussions with congress leaders on five to six disputed seats in maha vikas aghadi
महाविकास आघाडीत अद्याप पाच-सहा जागांवर पेच; शरद पवार, काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा; जागांबाबतचा वाद मिटविण्याचा प्रयत्न
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
Criminal action in case of beating of MSEDCL employees
महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यास महागात पडणार
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल

आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत २०११ च्या सर्वेक्षणानुसार राज्यातील ८३.७२ लाख कुटुंबांना पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य उपचार होणार आहेत. यात आर्थिक निकषांचा विचार फारसा नसला तरी २०११च्या यादीत नाव असणे गरजेचे आहे. शहर परिसरात आशा, अंगणवाडी सेविका, परिचारिकांकडून सर्वेक्षण करून पाच लाख तीन हजार ८०४ लाभार्थ्यांची यादी अंतिम झाली आहे. या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय तसेच मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात करण्यात येत आहे. लवकरच पुढील टप्प्यात खासगी रुग्णालयांमध्ये ही सेवा सुरू होईल, अशी माहिती आयुष्यमानचे विभागीय व्यवस्थापक डॉ. नितीन पाटील यांनी दिली.

दरम्यान, आरोग्य विभागाकडून जी यादी अंतिम झाली आहे. त्याविषयी नागरिक अनभिज्ञ आहेत. आपण योजनेचे लाभार्थी आहोत की नाही हेच त्यांना माहिती नाही. यातील अनेक तांत्रिक अडचणींना लाभार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच, अनेक लाभार्थी हे महात्मा फुले योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतचा उपचार घेत असल्याने या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. नाशिक जिल्हा परिसरात केवळ ९७ नागरिकांनी या योजनेअंतर्गत उपचार घेतले आहेत. त्यात काही परप्रांतीयांचा समावेश आहे.

या पाश्र्वभूमीवर सरकारी रुग्णालये, नगर परिषद कार्यालये, ग्रामपंचायत, महानगरपालिका आदी ठिकाणी लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी, लाभार्थ्यांनी तांत्रिक अडचणींचा निपटारा करण्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये मदत कक्ष सुरू करण्यात यावा, अशी मागणी जन आरोग्य अभियानाचे डॉ. अभिजित मोरे यांनी केली आहे.

लाभार्थ्यांनी ‘ई- सोनेरी कार्ड’ घ्यावे

लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध होत आहे. नावे यादीत असलेल्या लाभार्थ्यांनी महा-ई सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात असणाऱ्या संग्राम कार्यालयातून ‘ई- सोनेरी कार्ड’ काढून घ्यावे. यासाठी आधार आवश्यक आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे कार्ड वेगळे राहणार असून यासाठी प्रत्येकी ३० रुपये शुल्क द्यावे लागेल. कार्ड तयार करताना आधार आवश्यक आहे. यामुळे लिंकवर ही माहिती येईल. संपूर्ण देशात कोठेही रुग्णाला उपचार घेता येतील. सध्या राज्यात केवळ नाशिक आणि चंद्रपूर या ठिकाणीच ई-सोनेरी कार्डचे काम सुरू आहे. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

डॉ. नितीन पाटील (आयुष्यमान भारत, विभागीय व्यवस्थापक)