हानी कमी करण्यासाठी भिवंडीप्रमाणे मालेगावमध्ये प्रयोग

यंत्रमागाचे शहर अशी ओळख असलेल्या भिवंडी येथे काही वर्षांपूर्वी वीजपुरवठा आणि वसुलीसाठी खासगी संस्था नेमणुकीचा प्रयोग राबविला गेला. त्याची यशस्वीता लक्षात घेऊन तो प्रयोग आता मालेगावमध्ये राबविला जाणार आहे. या ठिकाणी वीजपुरवठा आणि थकबाकी वसुलीची जबाबदारी खासगी संस्थेकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

भिवंडीप्रमाणेच महावितरणच्या नाशिक परिमंडळात विजेची सर्वाधिक वितरण, वाणिज्यिक हानी मालेगाव शहर परिसरात आहे. सातत्याने प्रयत्न करून हानी जवळपास ५० टक्क्य़ांच्या आसपास आणण्यात आली असली तरी हानी पूर्णपणे टाळता आलेली नाही. यावर उपाय म्हणून महावितरणने आता या परिसरात वीजपुरवठा, वसुलीसाठी खासगी संस्थांची नियुक्ती करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. मालेगाव शहरातील तीन उपविभाग, ग्रामीण उपविभागातील काही भाग या ठिकाणी खासगी संस्था अर्थात ‘फ्रॅन्चायजी’ नियुक्तीबाबत महावितरणच्या मुख्य कार्यालयाने २० फेब्रुवारी २०१८ पर्यंत प्रस्ताव मागविले आहेत. ही जबाबदारी खासगी संस्थेला सोपविणे म्हणजे खासगीकरण नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. संबंधित खासगी संस्था महावितरणचे प्रतिनिधी म्हणूनच काम करणार आहे. वितरण-वाणिज्य हानी कमी झाल्यास भारनियमनाचा कालावधी कमी होऊ शकतो. त्याचा ग्राहकांना लाभ होईल, याकडे लक्ष वेधले जात आहे.  काही वर्षांपूर्वी भिवंडीची स्थिती मालेगावसारखी होती. तिथे ही कामे खासगी संस्थेकडे दिल्यावर वीज वितरण, वाणिज्य हानी कमी होऊन ग्राहकांना लाभ झाला.  मालेगावमध्ये हा प्रयोग राबविण्याची तयारी सुरू झाली आहे. या निमित्ताने वीज वितरण, वसुलीसाठी खासगी संस्थेचे प्रतिनिधी काम करतील. वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काही ग्राहक जुमानत नाहीत. यामुळे वीजदेयक थकबाकीचे प्रमाणही वाढत राहते. या स्थितीत महावितरण मालेगावमधील  जबाबदारी खासगी संस्थेला देत आहे.

३०० कोटीहून अधिकची थकबाकी

मालेगाव विभागात घरगुती, वाणिज्यिक, व्यावसायिक या लघुदाब ग्राहकांची संख्या दोन लाख तीन हजार २११, तर औद्योगिक उच्चदाब ग्राहकांची संख्या ७५ आहे. डिसेंबर २०१८ मध्ये या ग्राहकांनी वापरलेल्या ५५.६७ दशलक्ष युनिट विजेपोटी २५ कोटी २० लाख रुपयांची देयके देण्यात आली. पूर्वीच्या थकबाकीसह २६ कोटी १५ लाख रुपयांचा भरणा ग्राहकांनी केला. तर ३०७ कोटी ६४ लाख रुपयांची वीजदेयके अजूनही थकीत आहेत. डिसेंबर २०१७ अखेर ५२ हजार ४९९ घरगुती, वाणिज्यिक, व्यावसायिक ग्राहकांकडे १८ कोटी २५ लाख रुपयांची चालू वीजदेयके थकीत आहेत.

वितरण हानीची स्थिती

एप्रिल ते ऑक्टोबर २०१६ या कालावधीत मालेगाव विभागात वितरण हानी ३९.४९ टक्के, वाणिज्यिक हानी ५०.५९ टक्के होती. तर एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत मालेगाव विभागात वितरण हानी ४१.२६ टक्के, वाणिज्यिक हानी ४९.७२ टक्क्य़ांवर आली.