नाशिक येथील केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार यांचे आवाहन

नाशिक : करोनाकाळात संकटग्रस्तांना आधार देण्यासाठी प्राणवायूयुक्त खाटांची सुविधा असणारे राज्यातील केंद्र नाशिक येथे उभारण्यात आले. या आदर्शवत केंद्रापासून प्रेरणा घेऊन राज्यातील उद्योग, खासगी, सहकारी, शैक्षणिक संस्थांनी आपापल्या भागांत अशा सुविधा निर्माण केल्यास या संकटावर मात करता येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

महानगरपालिका आणि मेट भुजबळ नॉलेज सिटी यांच्या सहकार्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या मदतीने येथील विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या करोना काळजी केंद्राचे उद्घाटन रविवारी शरद पवार यांच्या हस्ते झाले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पवार हे प्रथमच दूरदृश्य प्रणालीद्वारे जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले. स्वयंसेवी संस्थांमार्फत उभारले जाणारे करोना केंद्र केवळ विलगीकरणासाठी असतात. परंतु, प्राणवायूयुक्त खाटांची सुविधा देणारे हे पहिलेच केंद्र आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन, वैद्यकीय क्षेत्राकडून अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. करोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्व संस्था, संघटनांची मदत आवश्यक आहे. राज्यातील सर्व भागात शक्य तितक्या क्षमतेचे करोना केंद्र उभारण्यास पुढाकार घेऊन समाज घटकांनी आपले वेगळेपण सिद्ध करावे,

अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वाढत्या करोना रुग्णांमुळे खाटा कमी पडत असून त्यामुळे रुग्णालयांवर मोठा ताण आल्याचे नमूद केले. या पार्श्वभूमीवर, प्राणवायूयुक्त खाटांची व्यवस्था असणाऱ्या करोना केंद्राची  उभारणी करण्यात आली असून त्यामुळे रुग्णालयांवरील ताण काहीसा कमी होईल, असे सांगितले. केंद्रात १८० खाटांसाठी प्राणवायूची स्वतंत्र वाहिनीची जोडणी करण्यात आली. प्राणवायूची साठवणूक करण्यासाठी एक किलोलिटर क्षमतेची टाकी बसविली गेली. देशातील विविध भागांतून सामग्री मागवून युद्धपातळीवर या केंद्रांची उभारणी करण्यात आली. केंद्रासाठी तज्ज्ञांसह ११ डॉक्टर, १५ प्रशिक्षित परिचारिका, रुग्णसेवक, औषध विक्रेता, केंद्र व्यवस्थापन, सुरक्षारक्षक आदींची नेमणूक करण्यात आली आहे.

उद्घाटनप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव आदी उपस्थित होते. उद्घाटन झाल्यानंतर काही वेळातच रुग्णांना केंद्रात दाखल करण्याचे काम सुरू झाले.