शाळेच्या मैदानावर खेळण्यास न दिल्याचा राग

नाशिक : क्षुल्लक कारणावरून चिडलेल्या अवघ्या १० वर्षांच्या मुलांनी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या तीन शालेय बसच्या काचेची तोडफोड केली. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांसह पालकही चक्रावले. पोलिसांनी या बालकांना समज देत सोडून दिले. विद्यार्थ्यांच्या या कृतीमुळे पालक, शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांना नाहक मनस्ताप झाला.

गंगापूर रोडवरील अभिनव बाल विकास मंदिर परिसरात शालेय मुलांना खेळण्यासाठी मैदान तसेच काही खेळणी आहेत. या खेळण्यांवर खेळण्यासाठी बाहेरील मुलेही येत असतात. सुरक्षा रक्षक अशा बाहेरील विद्यार्थ्यांना हटकण्याचे काम सातत्याने करतात.

शनिवारी असाच काहीसा प्रकार घडला. शनिवारी जोशी वाडा परिसरातील ९ ते १० वर्षांंची मुले शाळेतील खेळण्यांवर, मैदानावर खेळण्यासाठी आली. त्यावेळी शाळेच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना हटकले.

त्यांना घरी जाण्यास बजावत मैदानाबाहेर काढले. याचा  राग आल्याने सुरक्षारक्षक किंवा शाळेला अद्दल घडविण्यासाठी या तीनही मुलांनी एकत्र येत शनिवारी अभिनव बालविकास मंदिर गाठले. अंधाराचा फायदा घेत सुरक्षा रक्षकाची नजर चुकवत त्यांनी शाळेच्या आवारात प्रवेश केला. आजूबाजूचे दगड उचलत शाळेच्या आवारात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या उभ्या असलेल्या बसगाडय़ांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. मुलांच्या या दगडफेकीत शाळेच्या तीन गाडय़ांच्या काचा फुटल्या. आवाजाने सुरक्षारक्षकांसह इतरांनी वाहनतळाकडे धाव घेतल्यावर हा प्रकार लक्षात आला. तोपर्यंत संशयित पळून गेले.

सोमवारी सकाळी सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकाराविषयी शालेय व्यवस्थापनाने तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी करत तीनही मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्या पालकांना हा प्रकार समजल्यावर ते सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले. मुलांनी काच फोडण्याची दिलेली कारणे आणि त्यांचे वय पाहून पोलीसही चक्रावले.अखेर पोलिसांनी समज देत तिघांना घरी सोडले. या प्रकारामुळे शाळेला आर्थिक नुकसानीसह मनस्ताप सहन करावा लागला.