24 January 2021

News Flash

शहर बससेवेचे खासगीकरण

शहर बस वाहतुकीसाठी आवश्यक गाडय़ा खासगी पुरवठादाराकडून घेतल्या जाणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

पुरवठादाराला प्रति किलोमीटर दराने पैसे; महापालिकेला तिकिटाचे उत्पन्न; सेवेसाठी ३५० गाडय़ा

नाशिक : शहर बस वाहतुकीला नवीन आयाम देण्यासाठी महापालिकेने खासगीकरणांतर्गत ३५० गाडय़ा चालविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पुरवठादाराला किलोमीटर दराने पैसे देण्यात येणार असून त्यात बस, चालक आणि दुरुस्तीचा भाग हा पुरवठादाराचा असणार आहे. महापालिका तिकिटातून मिळणारे उत्पन्न घेणार आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर ही बससेवा सुरू करण्यात येत आहे.

राज्य परिवहनने महापालिकेला पत्र देऊन शहर बस वाहतूक तोटय़ात असल्याने ही सेवा बंद करण्याचे आधीच सूचित केले आहे. त्या अनुषंगाने महामंडळाने शहर बस वाहतुकीच्या अनेक फेऱ्या कमी केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत असताना रिक्षावाल्यांची मात्र चांगलीच कमाई होत आहे. एकेका रिक्षात क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केली जात आहे.

बसची पुरेशी उपलब्धता नसल्याने खच्चून भरलेल्या बसमधून धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागतो. सत्ताधारी भाजपने ही शहर बससेवा चालविण्यास उत्सुकता दाखविली होती.

काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास मान्यता दिल्यानंतर महापालिकेच्या पातळीवर त्यादृष्टीने हालचाली गतिमान झाल्या. ही बससेवा प्रभावीपणे कार्यान्वित व्हावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी पुणे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे सोपविली. त्यांनी वेळ न दवडता यंदाच्या अंदाजपत्रकात शहर बससेवेसाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करून काम सुरू केले. यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे.

बससेवेचा वापर वाढल्यास रस्त्यावरील दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर कमी होईल. या बससेवेसाठी नवी मुंबईमध्ये यशस्वी ठरलेल्या पद्धतीचा स्वीकार करण्यात येणार आहे. त्यात गाडय़ांची उपलब्धता, त्यांची देखभाल दुरुस्ती, चालक आणि तत्सम खर्चाचा बोजा महापालिकेवर पडणार नाही.

आधुनिक तंत्रज्ञानाने नजर

शहर बससेवेत माहिती तंत्रज्ञानाचा अधिकतम वापर केला जाणार आहे. शहर बससेवेचे वेळापत्रक, विविध मार्ग, बस येण्या-जाण्याच्या वेळा आदींची माहिती भ्रमणध्वनी अ‍ॅपवर उपलब्ध राहील. दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रत्येक बसवर नजर ठेवली जाईल. बस निश्चित केलेल्या मार्गावरील थांब्यावर थांबली की नाही, कोणत्या थांब्यावर किती प्रवासी चढले, तत्सम माहिती महापालिकेला प्राप्त होईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

बस, चालक, दुरुस्ती खर्च वाचणार

शहर बस वाहतुकीसाठी आवश्यक गाडय़ा खासगी पुरवठादाराकडून घेतल्या जाणार आहेत. ३५० गाडय़ा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. यामध्ये पुरवठादाराला बस, चालक तसेच दुरुस्तीचा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेचा हा खर्च वाचणार आहे. महापालिका पुरवठादाराला किलोमीटरमागे पैसे देणार आहेत. वाहतूक मार्ग, थांबे, प्रवास भाडे याची निश्चिती महापालिका करणार आहे. यातून मिळणारे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 2:06 am

Web Title: privatization of city bus service by nashik municipal corporation
Next Stories
1 महापालिकेच्या शाळाही कात टाकणार
2 अपंगांचे कल्याण
3 ‘सावाना’त पुस्तक शोधण्यात वाचकांची दमछाक
Just Now!
X