एकाचवेळी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमुळे कार्यकर्ते मिळणे मुश्कील; उपलब्ध कार्यकर्त्यांची अवास्तव मागणी

महापालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक एकाचवेळी होत असल्याने राजकीय पक्षांना प्रचारासाठी कार्यकर्ते मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे यासाठी सक्रिय झालेले व्यावसायिक गटांची प्रचारासाठी मदत घेण्याची वेळ या राजकीय पक्षांसह त्यांच्या उमेदवारांवर आली आहे. यासाठी निष्ठेपेक्षा आर्थिक गणिताची आकडेमोड त्यांना करावी लागणार आहे.

[jwplayer zZz7idXw-1o30kmL6]

बदलत्या परिस्थितीत पक्षनिष्ठा, तत्त्व, पक्षाचे धोरण वगैरे गोष्टींना नेते तसेच उमेदवारच काडीइतपतही किंमत दिली जात नाही. उमेदवारीसाठी दिवसातून तीन वेगवेगळे पक्ष बदलणारेही या निवडणुकीच्या दरम्यान दिसून येत आहेत. नेते आणि उमेदवारांची ही स्थिती असेल तर कार्यकर्ते तरी कसे एकनिष्ठ राहतील? पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसह बंडखोरांची असलेली अफाट संख्या कार्यकर्त्यांच्या पथ्थ्यावर पडली असून उमेदवारांना कार्यकर्त्यांचे पाय धरण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या या निवडणुकीत भल्यामोठय़ा प्रमाणात विस्तारलेले प्रभाग ही प्रचाराकरिता उमेदवारांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली आहे. प्रचारासाठी केवळ १३-१५ दिवस हाताशी असल्याने संपूर्ण प्रभागात पोहचणे अशक्य असल्याची जाणीव उमेदवारांनाही आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांची फळी हाताशी असणे त्यांच्यासाठी गरजेचे झाले आहे. परंतु, मागणी अधिक आणि कार्यकर्ते कमी अशी स्थिती असल्याने उपलब्ध कार्यकर्त्यांना जबरदस्त भाव आला आहे. कार्यकर्त्यांच्या दोन वेळच्या जेवणाच्या साग्रसंगीत व्यवस्थेसह त्यांना फिरण्यासाठी वाहन व्यवस्थाही उमेदवारांकडून उपलब्ध करून देण्यात येत असल्याने कार्यकर्त्यांची चंगळ सुरू आहे.

निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कार्यकर्त्यांकडूनही उमेदवारांकडे अवास्तव मागण्या करून कोंडीत पकडण्याचे प्रयत्न होत असून मागण्या मान्य न झाल्यास दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचारात गुंतण्याची धमकी दिली जात आहे. यावर पर्याय म्हणून कार्यकर्त्यांचा केवळ प्रचार फेऱ्यांपुरता उपयोग करून घेण्याचे धोरण काही उमेदवारांनी आखले आहे. त्यांच्या मदतीसाठी निवडणुकीची सर्व कामे करून देणारे काही व्यावसायिक गट पुढे आले असून ठरावीक रक्कम मोजल्यास हे गट मतदानाच्या दिवसापर्यंत सर्वकाही करून देण्यास तत्पर आहेत. पंचवटीतील म्हसरूळ परिसरात कार्यरत असलेल्या अशा एका गटाकडे एक, तीन, चार, सहा आणि १२ या प्रभागांमधील उमेदवारांनी यादीनुसार मतदारांची पडताळणी, घरोघरी जाऊन मतदारांच्या भ्रमणध्वनी क्रमांकांची नोंद करणे, प्रभागातून इतर ठिकाणी गेलेल्या मतदारांची नावे, बनावट मतदारांची नावे शोधणे, मतदारांच्या नावांच्या पावत्या वाटप करणे असे काम सोपविले. सर्वसाधारणपणे १० ते १५ लाख रुपये या सर्व एकत्रित कामांसाठी घेतले जात आहेत. या पद्धतीमुळे आपले काम बऱ्याच प्रमाणात सोपे होत असून प्रचाराकडे लक्ष देणे सोयीस्कर होत असल्याचे पंचवटीतील एका उमेदवाराने नमूद केले.

[jwplayer K8f2NOFD-1o30kmL6]