विवाहित प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत शिरून विवाहाची गळ घालत तिच्या कपाळावर कुंकू लावण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडला. या प्रकरणी संशयिताविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून युवकाला अटक करण्यात आली आहे.

योगेश जावळे (२९, चव्हाणके टॉवर, मखमलाबाद नाका) असे संशयिताचे नाव आहे. संशयित उच्चशिक्षित आहे. शहरातील एका महाविद्यालयातील विवाहित प्राध्यापिकेवर  एकतर्फी प्रेमातून त्याने प्राध्यापिकेचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवला. त्यानंतर वारंवार संपर्क साधून आणि समक्ष भेटून तो लग्नाची मागणी करू लागला. या घटनाक्रमाची माहिती प्राध्यापिकेने वरिष्ठांना दिली. यामुळे त्याला महाविद्यालयात बोलावण्यात आले. उच्चशिक्षित आणि डॉक्टरपुत्र असल्याने कानउघाडणी करीत समज देण्यात आली. तरीही त्याने पिच्छा सोडला नाही. अनेकदा महाविद्यालयात येऊन त्याने प्राध्यापिकेला भेटण्याचा प्रयत्न केला. सोमवारी तो पुन्हा महाविद्यालयात आला. प्राध्यापिका प्रयोगशाळेत असल्याचे समजल्यावर संशयित तिकडे गेला. आपल्याला नोकरी लागल्याचे सांगून त्याने प्राध्यापिकेकडे लग्नाची गळ घातली. खिशातील कुंकवाची पुडी बाहेर काढत प्राध्यापिकेच्या कपाळावर कुंकू लावण्याचा प्रयत्न केला. प्राध्यापिकेने विरोध केल्यावर तो तिच्यावर धावून गेला.  अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे प्राध्यापिका भयभीत झाली. प्रकार लक्षात येताच अन्य कर्मचारी मदतीला धावून आले. त्यांनाही संशयित युवकाने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्राध्यापिकेने दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.