11 December 2017

News Flash

निधीअभावी ‘कलाग्राम’चे भवितव्य अधांतरी

इमारत तयार असून संरक्षक भिंत, फरशी आदी कामे पूर्ण झाली असून केवळ किरकोळ कामे

प्रतिनिधी, नाशिक | Updated: March 21, 2017 4:23 AM

कोटय़वधी रुपये खर्च करून तयार झालेले कलाग्राम पर्यटनासह कला, साहित्य व संस्कृती, व्यवसायाला वेगळी दिशा देणारे असूनही निधीअभावी रखडले आहे.

राज्याचे पर्यटनमंत्री खान्देशातील सारंगखेडा अश्व बाजार आणि आदिवासी बांधवांच्या होलिकोत्सवाला वैश्विक आयाम देण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे खान्देशचे प्रवेशद्वार असणाऱ्या नाशिकमध्ये मात्र काही अस्तित्वातील प्रकल्पांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. पर्यटन विकास महामंडळाचा गोवर्धन शिवारातील कलाग्राम त्यापैकी एक. कोटय़वधी रुपये खर्च करून तयार झालेले कलाग्राम पर्यटनासह कला, साहित्य व संस्कृती, व्यवसायाला वेगळी दिशा देणारे असूनही निधीअभावी रखडले आहे. केंद्र सरकारने दाखविलेल्या उदासीन भू्मिकनंतर राज्य शासनानेही आवश्यक सहा कोटीं रुपयांचा निधी देण्यास नकार दिल्याने या प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी बनले आहे.

नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोवर्धन शिवारात शासकीय भूखंडावर पाच वर्षांपूर्वी ‘कलाग्राम’च्या उभारणीसाठी नारळ फोडण्यात आला होता. प्रारंभी गोवर्धनच्या ग्रामस्थांनी त्यास विरोध दर्शविल्याने काही वर्ष भूसंपादनात खर्ची पडले.

मात्र वेळेचा अपव्यय झालेला पाहता महामंडळाने निधीचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात निधी प्राप्त झाला यासाठी जागा ताब्यात आल्यानंतर ‘कलाग्राम’च्या बांधकामास सुरुवात करण्यात आली. दिल्ली हाट बाजारच्या धर्तीवर नाशिकमध्ये सुरू होणारे ‘कलाग्राम’ खऱ्या अर्थाने नाशिकचा चेहरा ठरणार आहे. यासाठी मंडळाने पर्यावरणपूरक व अभिनव पद्धतीने बांधकाम केले. आतापर्यंत केंद्र सरकारच्या ‘पीटीडीसी’ योजनेंतर्गत साडे आठ कोटींचा निधी खर्च झाला आहे.

इमारत तयार असून संरक्षक भिंत, फरशी आदी कामे पूर्ण झाली असून केवळ किरकोळ कामे बाकी आहेत. मात्र या कामांसाठी सहा कोटी रुपयांची गरज असून केंद्र सरकारने हात वर केल्याने राज्य सरकारकडे निधीची मागणी करावी, अशी सूचना करण्यात आली होती.

राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही निधी प्राप्त न झाल्याने हा प्रकल्प सुरू झालेला नाही. एकीकडे वेगवेगळ्या नवीन उपक्रमांची घोषणा होत असताना दुसरीकडे रखडलेल्या प्रकल्पांबाबत मात्र पर्यटन विभाग उदासीन असल्याचे चित्र आहे.

..तर पर्यटनासह व्यवसायाला वेगळी दिशा

आणखी आवश्यक सहा कोटी रुपयांचा निधी मिळाल्यास ‘कलाग्राम’चा विकास होणे शक्य आहे. तसेच झाल्यास कलाग्राममध्ये बाहेरगावहून येणाऱ्या पर्यटकांना नाशिक विभाग अर्थात धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार आणि नगर येथील वैशिष्टय़पूर्ण वस्तू यासह स्थानिक आदिवासींनी बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, शहरातील बचत गटांचे नावान्यपूर्ण खाद्यपदार्थ, कलाकुसरीच्या वस्तू एका छताखाली मिळणार आहेत. या ठिकाणी बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री सातत्याने सुरू राहील. जेणेकरून गटाच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळेल. दुसरीकडे, भारत संस्कृती प्रधान तसा विविधतेने नटलेला देश आहे असे आपण म्हणतो. हा विचार नागरिक तसेच विद्यार्थ्यांमध्ये रुजावा या दृष्टीने या वास्तूत वर्षभरात प्रत्येक महिन्याला एका राज्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्या त्या राज्याच्या खाद्य, वस्त्र, साहित्य, कला संस्कृतीचा परिचय या माध्यमातून करून देण्यात येणार आहे. या गोष्टींचा विचार करत कलाग्रामची वास्तू स्थापत्य कलेचा उत्तम नमुना ठरावी, यादृष्टीने नियोजन करून उभारली गेली. मागील वषी कुंभमेळ्यात हा प्रकल्प पर्यटकांसाठी खुला होणार होता. मात्र दोन वर्षांंपासून त्याचे काम रेंगाळले आहे.

First Published on March 21, 2017 4:23 am

Web Title: project kalagram stalled due to lack of funds