सार्वजनिक गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र सुरू असताना शहरात वाहतूक पोलिसांनी उत्सवाला सामाजिक भान देण्याच्या हेतूने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहतूक नियमांचे प्रबोधन करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले. ‘वाहतूक सुरक्षा’ अंतर्गत हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांना सूचना देण्यात आल्या. पुढील तीन दिवस हा उपक्रम शहरात सुरू राहील, असे वाहतूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

नियमांचे पालन वाहनचालकांसह सर्वानी करावे यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. याअंतर्गत मंगळवारी शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. अजय देवरे आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाहतूक सुरक्षा प्रबोधनात्मक कार्यक्रमास जुना गंगापूर नाका येथून सुरुवात झाली. या वेळी हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांशी संवाद साधत हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन डॉ. सिंगल यांनी केले. वर्षभरात केवळ अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या, त्यामुळे कुटुंबाची होणारी वाताहत याकडे त्यांनी लक्ष वेधले. दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांनी वाहन चालविताना काय काळजी घ्यावी, याविषयी त्यांनी माहिती दिली. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांकडून या वेळी गणपतीची रस्ता सुरक्षा आरती करून घेण्यात आली. दंडात्मक कारवाईसोबत प्रबोधनासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. जुना गंगापूर नाक्यासह शरणपूर रोड, एबीबी सर्कल, जेहान सर्कल या ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. पुढील तीन दिवस या उपक्रमांतर्गत शहर परिसरात ठिकठिकाणी कार्यक्रम होतील, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. देवरे यांनी दिली.