अनिवासीऐवजी निवासी दरात घरपट्टीची आकारणी होणार

नाशिक : शहरातील वकील, डॉक्टर, सनदी लेखापालांसह गृह उद्योग करणाऱ्या छोटय़ा व्यावसायिकांना अनिवासीऐवजी निवासी दरात घरपट्टी आकारण्याचा निर्णय बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण महापौर सतीश कुलकर्णी यांनी जाहीर केला. मंगळवारी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या वेळी बौद्धिक व्यवसाय करणारे घटक निवासी मिळकतीत काम करीत असल्यास त्यावर अनिवासीऐवजी निवासी दराने घरपट्टी आकारण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली.

या संदर्भात विविध न्यायालयांचे संदर्भ देण्यात आले. शहरात उपरोक्त व्यावसायिक निवासी मिळकतीत काम करत असतील तर अशा मिळकतींचा अनधिकृत वापर गृहीत धरून नियमित दराच्या तीनपट दंड विचारात घेऊन अनिवासी मूल्यांकन दराने घरपट्टी निश्चित केली जाते. निवासी मिळकतीत व्यवसाय करीत असल्याने अनिवासी दराने घरपट्टीची आकारणी करू नये म्हणून काही घटकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. या पार्श्वभूमीवर, कर विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता देताना महापौरांनी वकील, डॉक्टर, सनदी लेखापालांसह घरगुती छोटे व्यवसाय करणाऱ्यांना (गृहउद्योग) अनिवासीऐवजी निवासी दरात घरपट्टी आकारणी केली जाणार असल्याचे सांगितले.

मुळात करोनाच्या संकटामुळे मालमत्ता कराची थकबाकी वाढल्याने महापालिकेच्या उत्पन्नात घट होत आहे. या स्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देऊन उपरोक्त घटकांना घरपट्टीत सवलत देण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. काश्यपी धरणाच्या ३६ प्रकल्पग्रस्तांना महापालिकेच्या सभेत सामावून घेण्याच्या विषयावर चर्चा झाली. शहराबाहेरील प्रकल्पग्रस्तांना सामावून घेणार असाल तर त्याआधी खत प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची मागणी सदस्यांनी केली. महापालिकेचा आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना विचार केला जाईल, असे महापौरांनी नमूद केले.

क्रीडा शिष्यवृत्तीच्या छाननी समितीत गटनेतेही

राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग नोंदवून चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महापालिकेकडून शिष्यवृत्ती देण्याची योजना आधीच जाहीर झाली आहे. याची छाननी करण्यासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या समितीत लेखापाल, पालिकेच्या समाजकल्याण विभागाचे अधिकारी, क्रीडा अधिकारी आदींचा अंतर्भाव असल्याचे लक्षात आल्यावर नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. छाननी समितीत महापौर हे पदसिद्ध अध्यक्ष असतील. सदस्यांचाही त्यात अंतर्भाव होण्याची गरज व्यक्त करण्यात आली. महापौरांनी सर्वपक्षीय गटनेत्यांना छाननी समितीत स्थान देण्याचे निर्देश दिले.

शिक्षण समितीवर सदस्यांची नियुक्ती

महापालिकेच्या शिक्षण समितीवर सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपच्या संगीता गायकवाड, शिवाजी गांगुर्डे, शाहीन मिर्झा, सरिता सोनवणे, हेमलता कांडेकर तर शिवसेनेच्या ज्योती खोले, सुनील गोडसे, किरण गामणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र महाले यांचा समावेश आहे. पक्षांच्या संख्याबळाच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देऊन सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.