24 January 2020

News Flash

तृणधान्यातून १५ लाख मेट्रिक टन उत्पादन प्रस्तावित

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बियाणे, खते, कीटकनाशके यांची गरज समजून घेण्याची सूचना त्यांनी केली.

(संग्रहित छायाचित्र)

खरीप हंगामपूर्व बैठकीत आढावा

तृणधान्य पिकांसाठी खरिपात चार लाख ४७ हजार क्षेत्र प्रस्तावित असून त्यापासून १५ लाख ५५ हजार मेट्रिक टन उत्पादन कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षाही कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी खरिपाचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बियाणे, खते, कीटकनाशके यांची गरज समजून घेण्याची सूचना त्यांनी केली.

शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन, पीककर्ज देणे, शेतकरी महाबीज आणि खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होणारे बियाणे लक्षात घेऊन बियाण्यांच्या मागणीचे प्रस्ताव तयार करणे, बियाणे पुरवठा, खताचे नियोजन, पंतप्रधान पीक विमा योजना आदींचा आढावा बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने नवनवीन सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य असल्याविषयी चर्चा झाली. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कृती दल स्थापन केले आहे. शेतीची उत्पादन वाढ, उत्पादनावर करावयाची प्रक्रिया, योग्य साठवणूक सुविधा आणि मोठय़ा बाजारपेठांना जोडण्यासाठीची वाहतूक सुविधा आदींवर काम करणाऱ्या यंत्रणांचे एकत्रीकरण करण्याविषयी कृती दल काम करणार आहे.

पुढील काळात क्षेत्रीय स्तरावर होणाऱ्या कामावर जास्त भर दिला जाणार असून कोणीही आकडेवारीचे संकलन करण्यापुरते मर्यादित राहू नये, अशी सूचना मांढरे यांनी केली. कृषी विद्यापीठ तसेच या संदर्भात संशोधन करणाऱ्या संस्थांनी शेतकऱ्यांसाठी थेट संपर्क व्यवस्था स्थापन करावी आणि त्यांना योग्य पीक पद्धतीबाबत स्वत:हून मार्गदर्शन करावे असे सूचित करण्यात आले. यावेळी जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचे मंगेश खैरनार आदी उपस्थित होते.

सहा लाख ३४ हजार हेक्टरवर पेरणी

२०१९-२० या वर्षांसाठी खरिपाची सहा लाख ३४ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यात तृणधान्य पिकांसाठी चार लाख ४७ हजार क्षेत्र प्रस्तावित असून या पिकांपासून १५ लाख ५५ हजार मेट्रिक टन उत्पादन प्रस्तावित असल्याची माहिती पडवळ यांनी दिली. गळित धान्य पिकासाठी एक लाख नऊ हजार क्षेत्र प्रस्तावित आहे. पावसाच्या खंडाचे व्यवस्थापन सूक्ष्म सिंचनाद्वारे करण्यात येणार असून सोयाबीन पिकाच्या उत्पादकतेमध्ये १८२० किलोग्रॅम हेक्टरचे लक्ष्य साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पश्चिम पट्टय़ात भात हे प्रमुख पीक असून ०.८८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित केली जाणार असल्याचे पडवळ यांनी सांगितले.

First Published on April 25, 2019 2:19 am

Web Title: proposed to produce 1 5 million metric tonnes of cereal
Next Stories
1 प्रतिकूल परिस्थितीतही यंदा विक्रमी द्राक्षनिर्यात
2 सरकारने गुणवत्तापूर्ण शिक्षण, विज्ञान तंत्रज्ञानाच्या उपयोगितेकडे लक्ष द्यावे
3 वाढत्या गर्दीमुळे बस स्थानकात चोऱ्यांमध्ये वाढ
Just Now!
X