नाशिकमध्ये सर्वपक्षीयांकडून घोषणाबाजी, काळे झेंडे

नाशिकचे पाणी जायकवाडीला दिल्यामुळे स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या स्थानिकांच्या असंतोषाचा भडका शनिवारी राज्याचे जलसंपदा तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे शहरात आगमन झाल्यावर उडाला. जिल्हा नियोजन समिती आणि पाणी आरक्षणाच्या बैठकीसाठी आलेल्या महाजन यांना सर्वपक्षीय आंदोलक व शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांच्या पाणीविषयक चर्चेच्या मागण्यांमुळे अखेर मुंबईत सोमवारी या विषयावर बैठक घेण्याचे महाजन यांनी जाहीर केल्यानंतर तणाव निवळला.
गंगापूर व दारणा धरण समुहातील पाणी जायकवाडीला दिल्यामुळे जिल्ह्य़ातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जिल्ह्य़ाचे पालक मंत्री गिरीश ंमहाजन हेच जलसंपदा मंत्री असल्याने तेच या निर्णयामागे असल्याचा आरोप सर्वानी केला. शनिवारी दुपारी पालकमंत्र्यांचे आगमन जिल्हाधिकारी प्रवेशव्दारासमोर झाले. त्यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गाडीसमोर आडवे पडत महाजन यांना अडविण्याचा प्रयत्न केला. काहींनी काळे झेंडे दाखवत निषेधाच्या घोषणा दिल्या. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांना अखेर सौम्य लाठीमार केला. त्याचा मार राजकीय कार्यकर्त्यांसह काही पत्रकारांनाही बसला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. महाजन यांना धक्काबुक्कीचाही प्रयत्न झाला. महाजन हे पोलीस बंदोबस्तात नियोजन भवनात बैठकीसाठी शिरल्यावर काही आंदोलकांनी पोलिसांना न जुमानता सभागृहात प्रवेश करत काळे झेंडे दाखविले. लोकप्रतिनिधींनी पाणी प्रश्नावर त्वरीत चर्चा करण्याची मागणी केल्यावर नियोजन समितीची बैठक आवरती घेत पाणी आरक्षणासंदर्भात बैठक सुरू करण्यात आली. समन्यायी पाणी वाटपात नाशिकवर होणारा अन्याय अनेकांनी मांडला. अनेक शेतकऱ्यांनी अशा प्रकारे पाणी पळविले जात असेल तर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांसमोर आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नसल्याचा इशारा दिला. महाजन यांनी न्यायालयीन आदेशामुळे आलेल्या बंधनांची जाणीव करून देत पाण्यावरून राजकारण न करण्याचे आवाहन केले. तसेच या विषयावर २३ नोव्हेंबर रोजी मुंबईत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे जाहीर केले.