12 December 2018

News Flash

फुल बाजारात विक्रेते आक्रमक

मुंढे यांच्या निर्देशानुसार सर्व विभागात अतिक्रमणनिर्मूलन मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सीबीएस चौकातील दुकानांसमोरील वाढीव काम हटविताना पथक

अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाईला कडाडून विरोध; पालिकेची वाहने रोखली

महापालिकेने रस्त्यावरील अनधिकृत छोटय़ा-मोठय़ा विक्रेत्यांविरुध्द सुरू केलेल्या धडक मोहिमेला सोमवारी वेगळे वळण लागले. मध्यवर्ती भागातील सराफ बाजार परिसरात अनधिकृतपणे फुलबाजार थाटणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध पालिकेतर्फे कारवाई करीत माल जप्त करण्यात आला. या कारवाईला विक्रेत्यांनी कडाडून विरोध केला. जप्त केलेला माल परत करावा, या मागणीसाठी संतप्त फूल विक्रेत्यांनी पालिकेची वाहने रोखली. परिस्थिती चिघळत असल्याने पोलिसांनी आंदोलकांना पिटाळले. पोलीस बळाचा वापर करून महापालिका कारवाई करीत असल्याची तक्रार विक्रेत्यांनी केली. महापालिकेने कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार देऊन चार जणांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सर्व विभागात अतिक्रमणनिर्मूलन मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रमुख रस्ते, चौक फेरीवाल्यांच्या कचाटय़ात सापडले आहेत. अनेक विक्रेते रस्त्यावर ठाण मांडत असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडते. महापालिकेमार्फत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी प्रगतिपथावर आहे. त्या अंतर्गत ना-फेरीवाला क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. सरकारवाडालगत बोहोरपट्टी, सराफ बाजार हा परिसर ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून आधीच जाहीर झाला आहे. या स्थितीत परिसरात दररोज सकाळी फूलबाजार भरतो. संबंधित विक्रेत्यांना गणेशवाडीतील नव्या बाजारात जागा देण्यात आली आहे. त्या ठिकाणी जाण्यास विक्रेते तयार नाहीत. या पाश्र्वभूमीवर, महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक सकाळी सहा वाजता फूलबाजारात दाखल झाले. अतिशय अरुंद मार्गावरील बहुतांश जागा विक्रेत्यांच्या मालाने व्यापलेली असते.

पथकाने फुलांसह प्लास्टिकची टोपली, तत्सम सामग्री जप्त करण्यास सुरुवात केल्यावर एकच गदारोळ उडाला. काही विक्रेत्यांनी माल जमा करण्यास विरोध केला, तर काहींनी शक्य तो माल कारवाईतून सोडविण्यासाठी धडपड सुरू केली.

अकस्मात झालेल्या कारवाईमुळे परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पालिकेच्या पथकाने काही वेळात धडक कारवाई करून दोन मालमोटारी भरून माल जप्त केला. पालिकेची वाहने माल घेऊन निघाली असताना जमलेल्या जमावाने त्यास विरोध करण्यास सुरुवात केली. या वेळी पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली.

विक्रेते माल परत करण्याची मागणी करीत होते. परंतु, जप्त केलेला माल देता येत नाही. याची जाणीव संबंधितांना करून देऊनही कोणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने सरकारवाडा पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. वाहने रोखून धरलेल्या जमावाला पिटाळल्यानंतर पालिकेची वाहने जप्त केलेला माल घेऊन बाहेर जाऊ शकली, असे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले.

पालिका पथकाने गोंधळ घालणाऱ्या चार जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधितांनी जमावाला चिथावणी दिल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. विक्रेत्यांनी पालिकेच्या कारवाई विरोधात संताप व्यक्त केला. पोलीस बळाचा वापर करून पालिकेने हजारो रुपयांचा माल जप्त केला. या व्यवसायावर कुटुंबाचा चरितार्थ अवलंबून आहे. फूल नाशवंत माल असून त्याच्या नुकसानीला पालिका जबाबदार असल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला. या प्रकरणी महापालिकेने पोलिसात तक्रार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. अतिक्रमणनिर्मूलन कारवाईत अडथळा आणणे, गोंधळ घालणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

सीबीएस चौकातही कारवाई

सीबीएस चौकालगतच्या मेघदूत व्यापारी संकुलासह आसपासच्या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील १५ दुकानांचे पुढे आलेले फलक, ओटे आणि टपऱ्याही हटविण्यात आल्या. जेसीबी यंत्राच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. काही व्यावसायिकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन अतिक्रमण काढून घेण्याचा तयारी दर्शविली.

First Published on March 6, 2018 3:31 am

Web Title: protest against nmc for action on unauthorized vendors in nashik