पाथर्डी फाटा परिसरात पाण्याची अनियमित वेळ, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. निवडणुकीच्या वेळी पाणी, रस्ते आदींचा जाहीरनामा सादर करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पुढील काळात या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे आंदोलकांनी त्यांच्या खुर्चीवर रिकामी बादली व हंडा ठेवून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

वासननगर तसेच पाथर्डी परिसरात गेल्या काही वर्षांपासून पाणी प्रश्न बिकट स्वरूप धारण करत आहे. पाण्याची उपलब्धता असतानाही कृत्रिम पाणीटंचाई भासवून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्यात येते. दुसरीकडे, दररोज येणाऱ्या पाण्याची वेळ रात्री साडेदहा, मध्यरात्री अडीच, साडे तीन अशी असल्याने महिलांची झोप पूर्ण होत नाही. त्यात रात्री-अपरात्री येणारे पाणी पुरेशा दाबाने नसल्याने पाण्याचा साठाही करण्यास मर्यादा पडतात. याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही दाद दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. स्थानिक नगरसेवकांनी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. काही महिन्यांपूर्वी आंदोलन केले असता लवकरच प्रभाग क्र. ५२ मधील पाणी प्रश्न सुटणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नियोजित कालावधी उलटूनही अद्याप परिस्थिती बदललेली नाही. तीन दिवसांपासून अनियमितता आणि कमी दाबाने पाणी येत असल्याने मुरलीनगर, मुरलीधरनगर, वासननगर, पाणिनी सोसायटी येथील नागरिकांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागीय कार्यालयात ठिय्या दिला. संबंधित अधिकाऱ्यांकडे आपले गाऱ्हाणे निवेदनाच्या स्वरूपात मांडले. परंतु संबंधित अधिकाऱ्याने आजच आपली नियुक्ती झाल्याने या प्रश्नाचा अभ्यास करून तोडगा काढण्यात येईल, असे सांगत निवेदन न स्वीकारता दालनातून काढता पाय घेतला.
परिणामी नागरिकांनी त्यांच्या दालनातील रिकाम्या खुर्चीवर रिकामी बादली, रिकामा हंडा ठेवून निवेदन दिले. याबाबत लवकरच कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संबंधितांनी दिला आहे.