News Flash

आदिवासी विकास भवनासमोर निदर्शने

आश्रमशाळा व वसतिगृहांवर चालत असलेल्या गैरव्यवहारांवर आयुक्त कार्यालयाचे नियंत्रण नाही.

आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहातील समस्या तसेच अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात मंगळवारी आदिवासी विकास भवनसमोर आदिवासी संघर्ष परिषदेतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी आदिवासी आयुक्तांना निवेदन देत परिस्थितीत लवकर सुधारणा न झाल्यास कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
आदिवासी विकास आयुक्तालय कार्यालयात वर्षांनुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचारी तसेच प्रतिनियुक्तीवर असलेले कर्मचारी यांच्या तत्काळ बदल्या कराव्यात तसेच आयुक्त कार्यालयात स्वीय साहाय्यक व लघुलेखक यांची मंजूर पदे भरलेली असतानाही दोन जादा प्रतिनियुक्तीने लघुलेखक काम करत आहेत. इतक्या लघुलेखकांची आयुक्त कार्यालयास गरज आहे का, असा प्रश्न आंदोलकांनी केला. आश्रमशाळा व वसतिगृहांवर चालत असलेल्या गैरव्यवहारांवर आयुक्त कार्यालयाचे नियंत्रण नाही. आश्रमशाळा तसेच वसतिगृहांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना श्रेणीनिहाय गणवेशाचा रंग ठरवून देण्याची मागणी करण्यात आली. दिंडोरी येथील मुलींच्या वसतिगृहातील विषबाधाप्रकरणी अहवालावर भोजन ठेकेदारावर कारवाई करावी, बिरंगळ येथे शिक्षकाला गृहपाल म्हणून दिलेली नियुक्ती नियमबाह्य़ असून ही नियुक्ती रद्द करावी, आसरबारी आश्रमशाळेत निकृष्ट दर्जाचा धान्यपुरवठा करणाऱ्या पुरवठादारावर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. आजपर्यंत कोणतीही आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलेले नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी परिषदेने निवेदनात केली आहे.
नाशिक प्रकल्पांतर्गत आतापर्यंत वसतिगृहात निकृष्ट भोजनपुरवठा करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध वेळोवेळी तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, प्रकल्प कार्यालयांना स्थानिक व आदिवासी विभागातील अनुभवी अधिकारी यांची प्रकल्प अधिकारीपदी नियुक्ती करावी, नाशिक प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळा व वसतिगृहांवर मध्यवर्ती स्वयंपाकगृह ही योजना प्रभावीपणे राबवावी आदी मागण्यांकडे आंदोलकांनी लक्ष वेधले.
या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा राजेश गायकवाड, अर्जुन गांगुर्डे, विशाल जाधव, कृष्णा मोरे यांच्यासह आंदोलकांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 9:23 am

Web Title: protest in front of tribal development office
Next Stories
1 आपत्ती व्यवस्थापनाचे पाठ देण्यासाठी अनोखा प्रयोग
2 नाशिकमध्ये प्रथमच ‘क्युटिकॉन २०१५’ अधिवेशन
3 गुप्तधनाच्या लालसेपोटी त्रिंगलवाडी किल्ल्यावर खोदकाम