हेल्मेट जनजागृतीसाठी वाहतूक शाखेच्या वतीने खास अशी आरती करण्यात आली असून त्याद्वारे हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी स्वारांना  त्यासाठी गणेशाच्या  वेशभुषेतून प्रबोधन केले जात आहे. आरती म्हणण्यापूर्वी बाप्पाने वाहनधारकांना हेल्मेट वापरा.. आणि आपले अमूल्य डोके सांभाळा. असे आवाहन गणपती करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे.  नाशिक शहर पोलीस आणि वाहतूक शाखा यांच्यावतीने गणेशोत्सवाचे निमित्त करुन हेल्मेट वापराविषयीच्या लढविलेली ही शक्कल दुचाकीस्वारांच्या चांगलीच पचनी पडत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शहर वाहतूक शाखा हेल्मेट वापराविषयी प्रबोधन करीत आहे. त्यासाठी साम, दाम, दंड त्रिसुत्रीचा अवलंब करूनही वाहनचालकांच्या मानसिकतेत फरक पडत नसल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर, गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाविद्यालयीन युवकांना सोबत घेऊन या अनोख्या उपक्रमाची आखणी झाली. शहर वाहतूक शाखेच्या मदतीने शुक्रवारी शहरात अचानक गणपती बाप्पा प्रकटला. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील शरणपूर चौफुलीवर हेल्मेट न घातलेल्या भाविकांना एकत्रित करण्यात आले. त्यांना बाप्पाने वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली. हेल्मेट घालणे कसे महत्वाचे आहे हे पटवून दिले. मला माझे डोकं बदलण्याची संधी मिळाली, कारण माझ्या वडिलांमध्ये तसेच माझ्यात काही शक्ती होती.. मात्र तुमच्यात ती नाही. तेव्हा भक्तांनो, हेल्मेट वापरा आपले अमूल्य डोके सांभाळा.. असे आवाहन बाप्पाने केले आहे.

सुरक्षित प्रवासासाठी तसेच आरोग्यदायी आयुष्यासाठी हेल्मेट वापरण्याचे आवाहन त्याने केले. दरम्यान, हेल्मेट न घालणाऱ्या भाविकांना एकत्र करत गणपतीची वाहतूक नियमांचे प्रबोधन करणारी आरती म्हणण्यात आली. या उपक्रमास वाहनचालकांचा उत्स्फुर्तप्रतिसाद लाभला. शहरातील इतरही प्रमुख चौकात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, उपायुक्त (वाहतूक) लक्ष्मीकांत पाटील, एस. बी. काळे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.