नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन आणि दातार कॅन्सर जेनेटिक्स लिमिटेड यांचा उपक्रम

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन आणि दातार कॅन्सर जेनेटिक्स लिमिटेड यांच्यातर्फे यंदाही आषाढी एकादशीचे औचित्य साधत २८ ते ३० जून या कालावधीत पंढरपूर सायकल वारी केली जाणार आहे. या वारीत कर्करोग आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराविरोधात प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती सायकलवारीचे प्रमुख अ‍ॅड. वैभव शेटे यांनी दिली.

वारीचे हे आठवे वर्ष असून पोलीस अधिकारी हरीश बैजल यांच्या संकल्पनेतून सुरू  झालेल्या या सायकल वारीची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नाशिकला सायकलिंगचे शहर बनविताना त्यास अध्यात्मिक जोड देत शेगाव, शिर्डी या फेऱ्यांसह अष्टविनायक दर्शन फेरीचे आयोजन नाशिक सायकलिस्टतर्फे दरवर्षी करण्यात येते. सध्याच्या जलद झालेल्या जीवनात केवळ तीन दिवसांत पर्यावरणपूरक वारी करण्याची संधी वारकऱ्यांना सायकल वारीच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून व्यायाम, आरोग्य, पर्यावरण आणि अध्यात्म असा या चतुसूत्रीचा अवलंब करण्यात येणार आहे.

फेरीत पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला, खेळाडू यांना सवलतीच्या दरात नोंदणी करून घेण्यात येणार आहे. प्लास्टिकमुक्त, पर्यावरणपूरक आणि सामान्य वातावरणातील ही वारी अनुभवण्याचे आवाहन नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांनी केले आहे.

नियोजित पंढरपूर सायकल वारी २८ जून रोजी सकाळी सहा वाजता अनंत कान्हेरे मैदानापासून निघणार असून पहिल्या टप्प्यात पहिल्या दिवशी वारी सिन्नर, नानाज, राहुरीमार्गे अहमदनगर शहरात मुक्कामी थांबणार आहे. दुसऱ्या टप्प्यात रुई छत्तिसी, करमाळामार्गे टेंभुर्णी येथे मुक्काम, त्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी ५० किलोमीटरचा सायकल प्रवास करत चंद्रभागेत स्नान करून पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास वाहनाने करणार आहे. पंढरपूरजवळच्या खेडलेकर महाराज आश्रमाच्या मैदानात सायकल रिंगण होणार आहे.

पंढरपूर सायकल वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एनआरएम फेरी आणि इतर फेऱ्यांसह विशेष सराव शिबिरे होणार आहेत. १६ वर्षांखालील मुलामुलींना पंढरपूर सायकल वारीमध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांच्या सोबत त्यांचे एक पालक (आई किंवा वडील) असणे बंधनकारक आहे.

पंढरपूर सायकल वारीची नोंदणी नाशिक सायकलिस्टच्या संकेतस्थळावरून करता येणार आहे. नाशिकमधील सर्व सायकलची दुकाने तसेच सायकल अड्डा, रेणुका प्लाझा, जीपीओ रोड, शालिमार येथे अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अधिक माहितीकरिता भूषण भुजबळ (७४४७७७८८४४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.