17 December 2017

News Flash

‘सप्तशृंग’चे सौंदर्य बहरणार

शासन स्तरावरून तीर्थक्षेत्र ठिकाणी स्वच्छतेसाठी प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे.

कळवण | Updated: October 10, 2017 3:19 AM

सप्तशृंग  गडावर करण्यात येत असलेली स्वच्छता मोहीम (छाया- डॉ. किशोर कुवर) 

सूक्ष्म कृती आराखडा करण्याचे निर्देश; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक

सप्तशृंगगड जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ होण्यासाठी व त्याचे सौंदर्य बहरण्यासाठी प्रयत्न सुरू करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला असून त्यासाठी एक सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्याचे तसेच गडावर पर्यटकांमार्फत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.

कळवण तहसील विभाग, सप्तश्रृंग गड ग्रामपंचायत, सप्तशृंग न्यास व व्यापारी संघटना यांच्या वतीने सप्तशृंगगडावर प्लास्टिकबंदी व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यानिमित्ताने आयोजित बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. शासन स्तरावरून तीर्थक्षेत्र ठिकाणी स्वच्छतेसाठी प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. यापुढे प्लस्टिकचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देताना त्यासाठी व्यावसायिक व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीभा संगमनेरे, तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, सरपंच सुमन सूर्यवंशी, उपसरपंच कविता व्हर्गळ, सदस्य राजेश गवळी आदी उपस्थित होते.

बैठकीआधी सकाळी संगमनेरे, तहसीलदार चावडे, गटविकास अधिकारी बहिरम यांनी झाडू घेत सर्व ग्रामसेवक, तलाठी, पंचायत समितीचे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, व्यावसायिक, वन विभागाचे अधिकारी यांना सोबत घेत गडावर स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छतेबाबत जनजागृती केली. सप्तशृंगगड ते मार्कंडेश्वर पर्वत या दरम्यान रोप वे होणार असल्याने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी व वनविभागाचे अधिकारी यांसह ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी, संदीप बेनके, तुषार बर्डे आदींनी जागेची पाहणी केली.

सप्तशृंगगडावर पूर्णत: प्लास्टिक बंदीसाठी दुकानांची तपासणी करण्याकरिता तालुकास्तरावरून तहसीलदार व गटविकास अधिकारी, तर जिल्हा स्तरावरून प्रतीभा संगमनेरे अचानक भेट देऊन कोणाकडे प्लास्टिक आढळल्यास कडक कार्यवाही करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सप्तशृंग गड व नांदुरी येथे प्लास्टिक बंदी करण्यात आली असतांनाही यात्रा काळात प्लास्टिकचा वापर करणारे दुकानदार विष्णू सावंत, संभाजी गायकवाड यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.

सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात

अनेक महिन्यांपासून गडावरील सप्तशृंगी न्यासच्या भक्त निवासचे सांडपाणी डोंगराच्यामार्गे कळवण रस्त्यावर असलेल्या गोबापूर ग्रामपंचायतमधील पिंपरी गावातील तलावात वाहून येत आहे. त्यामुळे पिंपरी गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने सांडपाणी त्वरित बंद करा, अन्यथा भक्त निवास बंद करू, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी न्यासला दिला. जलयुक्त शिवार फेरीदरम्यान मार्कंड पिंपरीजवळील धरणातील पाणी दूषित झाले असल्याचे ग्रामस्थांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्याच वेळी तहसीलदारांनी न्यासच्या बैठकीत सांडपाण्याविषयी तातडीने उपाययोजना करण्याची सूचना केली होती.

First Published on October 10, 2017 3:19 am

Web Title: public awareness campaign for cleanliness on saptashrungi gad
टॅग Saptashrungi Gad