News Flash

लोकप्रतिनिधींकडून पुन्हा एकदा स्वच्छतेची ‘चमकोगिरी’

शहर काँग्रेस समितीच्या वतीने गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.

अनेक दिवस घंटागाडी फिरकली नसताना महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता मोहिमेंतर्गत अचानक जाग येत सोमवारी सिडकोच्या पाटीलनगर परिसरात घंटागाडी आली. त्यामुळे कचरा टाकण्यासाठी अशी गर्दी झाली.

केंद्र शासनाच्या सहकार्याने महात्मा गांधी जयंतीला सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या तृतीय वर्धापन दिनी स्वच्छता अभियानापेक्षा चमकोगिरीला अधिक प्राधान्य दिले गेल्याचा प्रत्यय सोमवारी येथे आला. भाजपच्या सर्व तर इतर पक्षांतील काही आमदारांनी आपल्या मतदारसंघात अभियानात सहभाग नोंदविल्याचे पाहावयास मिळाले. प्रदीर्घ काळापासून कचऱ्याच्या विळख्यात सापडलेल्या मुख्य बसस्थानकांनी मात्र, या अभिनायानांतर्गत मोकळा श्वास घेतला.

प्रशासनाच्या वतीने महात्मा गांधी जयंती तसेच लालबहादूर शास्त्री जयंती याचे औचित्य साधून शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, ठिकठिकाणी मोहिमा राबवून साफसफाई केली. सरकारने मोहिमेत आवाहन करताच भाजपच्या सर्व आमदार मोहिमेत सहभागी झाले.

महापालिकेच्या मुख्य कार्यालयात महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे व नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि महानगरपालिका यांच्या सहकार्याने मुख्य रस्ते स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले. या मोहिमेचा आरंभ आरोग्य समिती सभापती सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.

श्री रविशंकर रोड ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, महामार्गापर्यंतच्या रस्त्यावरील धूळ साफ करत कागद, प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. गोदाप्रेमी सेवा समितीच्या वतीने रामकुंड परिसरातील महात्मा गांधी ज्योत येथे गांधीजींना आदरांजली वाहण्यात आली. गांधीजींनी शिकवलेल्या सत्य व अहिंसेच्या मार्गाची माहिती देवांग जानी यांनी दिली. या वेळी पद्माकर पाटील व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शहर काँग्रेस समितीच्या वतीने गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी निरीक्षक रवींद्रकुमार झा यांनी मार्गदर्शन केले. गांधीजींनी भारतासाठी मोठे योगदान दिले आहे. सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आपण गांधीजींसारखे रस्त्यावर उतरत लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून द्यायला हवी असे ते म्हणाले. गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधत राष्ट्रसेवा दलाच्या वतीने गांधीजींच्या चष्माची प्रतिकृती असलेला सात बाय नऊ फूट आकाराचा चष्मा बनविण्यात आला. काँग्रेस कार्यालयाबाहेर तो ठेवण्यात आला आहे. गांधीजींचे विचार सर्व दूर पोहचावे हा त्यामागे उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारातही गांधीजी व शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सिडको महाविद्यालयात रोव्हर, रेंजर, एनसीसी व क्रीडा विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. नाशिक जिल्ह्यातील १३ आगारांमध्ये नियमितपणे स्वच्छता राहावी यासाठी एसटी महामंडळाने हे काम एका खासगी संस्थेला सोपविले आहे. या कंपनीच्या स्वच्छता यंत्राचे ठक्कर बाजार स्थानक परिसरात आ. प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आगार स्वच्छतेची व्यापक मोहीम राबविली गेली.

जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय कार्यालयांत साफसफाई करण्यात आली. स्वच्छता अभियानाचे सोपस्कार पार पाडताना लोकप्रतिनिधींसह मान्यवरांनी केवळ कचरा संकलनाचे काम केले. रस्त्याच्या बाजूला झाडाची पाने, कागदे, प्लास्टिक कचरा लावून ‘फोटोसेशन’ करण्यात धन्यता मानली. यामुळे मोहिमेनंतर त्या परिसरात काही भागात कचरा जैसे थे पडल्याची तक्रार नागरिकांनी केली.

 

फतवा आणि सूचना

भोसला सैनिकी महाविद्यालयात गांधी जयंतीनिमित्त होणाऱ्या स्वच्छ भारत अभियानासाठी सर्व प्राध्यापकांनी हजर राहावे, असा फतवा काढण्यात आला. मात्र प्राध्यापकांची नाराजी पाहता ही सूचना मागे घेत वरिष्ठांनी नंतर केवळ किमान आपल्या घराची स्वच्छता करा, त्यानंतर परिसराची आणि तसे छायाचित्र आपल्या महाविद्यालयाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर टाका अशी सूचना देण्यात आली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2017 3:42 am

Web Title: public representative shining on swachh bharat abhiyan
टॅग : Swachh Bharat Abhiyan
Next Stories
1 मुहूर्त साधण्यासाठी बाजारपेठ सज्ज
2 दिवाळीआधीच फटाक्यांवर निर्बंधांचा बार
3 पंकजा मुंडेंकडून ऊसतोड कामगारांची फसवणूक
Just Now!
X